अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवला अन् तक्रारदारालाच धमकी?

0

🔥संजय खंडारे ठाणेदार आर्णी

🔥अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवला अन् तक्रारदारालाच धमकी?

🔥आर्णी पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह; राज्यपालांकडे निष्पक्ष चौकशीची मागणी

आर्णी -/ शहरातील कथित अवैध धंद्यांविरोधात तक्रार करणे एवढेच ‘गुन्हे’ ठरू लागले आहे का? तक्रारदारालाच पोलीस ठाण्यात वारंवार बोलावून दबाव आणला जात असेल, तर सामान्य नागरिकांनी दाद मागायची तरी कुठे? आर्णी येथील सामाजिक कार्यकर्ता जुनेद रफिक शेख यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शहरातील कथित अवैध व्यवसाय आणि कायदा-सुव्यवस्थेबाबत शेख यांनी २१ ऑगस्ट रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना आर्णी पोलीस ठाण्यात सलग दोन दिवस बोलावून बयान नोंदविण्यासाठी दबाव आणण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

यापुढे जाऊन पोलीस निरीक्षक संजय खंडारे यांची भेट घेतल्यानंतर तक्रारीच्या विषयावरून कथितरीत्या उद्धट भाषा वापरण्यात आली आणि भविष्यात अशा तक्रारी करू नयेत, अशी तंबी देण्यात आल्याचा दावा शेख यांनी केला आहे. एवढेच नव्हे, तर आपला ‘बंदोबस्त’ केला जाऊ शकतो किंवा खोट्या गुन्ह्यात अडकविले जाऊ शकते, अशा स्वरूपाची धमकी दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी राज्यपालांना सादर केलेल्या निवेदनातून केला आहे.

🔥तक्रारदारच आरोपीच्या पिंजऱ्यात?

कथित अवैध धंद्यांविरोधात तक्रार करणाऱ्या नागरिकाला संरक्षण आणि विश्वास देण्याऐवजी त्याच्यावरच दबाव आणला जात असल्याचा आरोप खरा असेल, तर हा प्रकार केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही. ‘तक्रार करा, पण परिणाम भोगण्याची तयारी ठेवा’ असा संदेश तर दिला जात नाही ना? असा सवाल या प्रकरणामुळे उपस्थित होत आहे.

शेख यांनी राज्यपालांकडे निवेदन देत आर्णी शहरातील कथित अवैध धंद्यांची स्वतंत्र चौकशी करावी, तक्रारीनंतर झालेल्या घटनांची वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

आरोपांची सत्यता चौकशीत स्पष्ट होणे अपेक्षित असून, दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी. तसेच तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेची दखल घ्यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

आता राज्यपालांकडे केलेल्या या तक्रारीची दखल घेऊन प्रशासन काय भूमिका घेते आणि या गंभीर आरोपांची निष्पक्ष चौकशी होते का, याकडे आर्णीकरांचे लक्ष लागले आहे.

      ब्युरो रिपोर्ट साहसिक      News-/24 आर्णी,यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!