पुसद अर्बन बँक बोगस कर्ज घोटाळा : गुन्हे शाखेकडून पतसंस्थेचा शाखा व्यवस्थापक गजाआड मात्र आत्महत्या ग्रस्त कुटुबींयाच काय 

0

🔥पुसद अर्बन बँक बोगस कर्ज घोटाळा : गुन्हे शाखेकडून पतसंस्थेचा शाखा व्यवस्थापक गजाआड मात्र आत्महत्या ग्रस्त कुटुबींयाच काय 🔥हेच तेपुसद अर्बन बँक चे बोगस कर्ज वाटप करणारे अध्यक्ष शरद मेंद

🔥​६.६८ कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी दुसरी मोठी कारवाई

🔥​अध्यक्ष शरद मैंद यांच्यानंतर ललित दांडेकर अटकेत

🔥​कंत्राटदार पी. व्ही. वर्मा आत्महत्या प्रकरणाशीही धागेदोरे; सहकार क्षेत्रात खळबळ

​यवतमाळ ( प्रतिनिधी) -/ पुसद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेशी संबंधित बहुचर्चित ६ कोटी ६८ लाख रुपयांच्या बोगस कर्ज गैरव्यवहार प्रकरणात नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने दुसरी मोठी कारवाई केली आहे. या घोटाळ्याशी थेट संबंध उघडकीस आल्यानंतर ‘भारती मैंद क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी’चा शाखा व्यवस्थापक ललित दांडेकर याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या . यापूर्वी पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) शरद मैंद यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने शरद मैंद आणि ललित दांडेकर या दोघांनाही पोलीस कोठडी सुनावली होती.

या कारवाईमुळे विदर्भातील सहकार व बँकिंग क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली असताना या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुसद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाने माजी उपाध्यक्ष राकेश खुराणा यांची बँकेच्या नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.

​गुन्हे शाखेच्या आर्थिक तपास पथकाने २७ सप्टेंबर 2025 रोजी पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांना ताब्यात घेतले होते. तपासादरम्यान शरद मैंद आणि पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक ललित दांडेकर यांच्यातील संशयास्पद दूरध्वनी संभाषणे, डिजिटल पुरावे आणि इतर कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली. या कागदपत्रांच्या आधारे दांडेकरचा या संपूर्ण बनावट कर्ज वितरणामध्ये सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत दांडेकरला अटक केली. दोघांनाही प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केले असता, या गैरव्यवहाराची व्याप्ती आणि कार्यपद्धती सखोलपणे तपासण्यासाठी न्यायालयाने दोघांच्याही पोलीस कोठडीत वाढ केली होती.

​या संपूर्ण घोटाळ्याच्या केंद्रस्थानी सर्वसामान्य नागरिकांच्या ओळखपत्रांचा केलेला गैरवापर असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रसेन यादव नामक व्यक्तीने पुसद अर्बन बँकेकडे कर्जासाठी अर्ज केला होता. बँकेने त्यांना सुमारे १.५६ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. या कर्जासाठी जामीनदार म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे घेण्यात आली होती.

​आरोप असा आहे की, शरद मैंद यांनी जामीनदारांची हीच कागदपत्रे आणि वैयक्तिक ओळखपत्रे बेकायदेशीरपणे वापरली. या कागदपत्रांच्या आधारे ‘भारती मैंद क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी’मधून नियमबाह्य पद्धतीने तब्बल ६.६८ कोटी रुपयांची बनावट कर्जे मंजूर करून घेतली. त्यानंतर कोणत्याही कायदेशीर पडताळणीविना ही कोट्यवधींची रक्कम परस्पर हडप करण्यात आली. विशेष म्हणजे, भारती मैंद पतसंस्थेमध्ये शरद मैंद यांचे वडील अप्पाराव मैंद हेदेखील एक प्रमुख विश्वस्त व महत्त्वाचे पदाधिकारी असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

​या बोगस कर्ज घोटाळ्याची व्याप्ती केवळ आर्थिक गैरव्यवहारापुरती मर्यादित नसून, १ सप्टेंबर रोजी नागपूरच्या राजनगर येथील रहिवासी असलेले सरकारी कंत्राटदार पी. व्ही. वर्मा यांच्या संशयास्पद आत्महत्या प्रकरणाशीही या प्रकरणाची पाळेमुळे जोडली गेली आहेत. वर्मा यांच्या मृत्यूनंतर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात शरद मैंद यांचे नाव समोर आले होते. कनिष्ठ न्यायालयाने शरद मैंद यांना दिलेल्या जामिनाला आव्हान देणाऱ्या फेरविचार याचिकेवर ४ ऑक्टोबर 2025रोजी सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. ​दुसरीकडे, शरद मैंद यांनी आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने पोलिसांना या प्रकरणाचा तपास सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत; मात्र न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय दोषारोपपत्र दाखल करू नये, असे निर्देश दिले आहेत.

   🔥​दोन बड्या व्यापाऱ्यांची चौकशी; एक जण आजारपणाचे कारण देत गैरहजर

​वर्मा आत्महत्या प्रकरणाच्या समांतर तपासात गुन्हे शाखेने नागपुरातील बियाणी आणि सेठ या दोन बड्या व्यावसायिकांना समन्स बजावले होते. वर्मा यांच्या आत्महत्येच्या काही दिवस आधी या दोन व्यापाऱ्यांनी एका पिता-पुत्राला वर्मा यांच्या राजनगर येथील निवासस्थानी कथितरित्या डांबून ठेवले होते. वर्मा यांच्या पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये या जबरदस्ती आणि बंधक बनवण्याच्या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी केली होती. पोलिसांनी व्यापारी बियाणी यांचा जबाब नोंदवला असून, सेठ यांनी मात्र प्रकृतीचे कारण पुढे करून चौकशी टाळल्याचे समजते.

    🔥​फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश; सहकारातील गैरव्यवहार चव्हाट्यावर

​या संपूर्ण प्रकरणामुळे महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँका आणि पतसंस्थांमधील अंतर्गत नियंत्रण यंत्रणा, कर्ज मंजुरीची पडताळणी प्रक्रिया आणि ढिसाळ कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुसद अर्बन बँक आणि भारती मैंद पतसंस्थेच्या सर्व व्यवहारांचे आणि वित्तीय नोंदींचे ‘फॉरेन्सिक ऑडिट’ (न्यायवैद्यकीय लेखापरीक्षण) केले जाणार आहे. या घोटाळ्यात आणखी काही संचालक, व्यवस्थापक आणि मध्यस्थांचा सहभाग असण्याची दाट शक्यता असून आगामी दिवसांत आणखी मोठ्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी या घोटाळ्याबाबत माहिती असणाऱ्यांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.(क्रमशः)

              ब्युरो रिपोर्ट साहसिक       News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!