कारागृहातील कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रास आयुक्तांची भेट
प्रतिनिधी / वर्धा :
जिल्हा कारागृहात असलेल्या बंदींना कारागृहातून बाहेर पडल्यानंतर हक्काचा स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी त्यांना कारागृहातच कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
कारागृहातील या प्रशिक्षण केंद्रास विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज भेट दिली.
यावेळी विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, तहसिलदार रमेश कोळपे यांच्यासह कारागृहातील अधिकारी आदी उपस्थित होते. नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या संकल्पनेतून प्रशिक्षणाचा हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.
कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राचे वतीने संगणक प्रशिक्षण व टेलरींग आणि जिल्हा व्यवसाय शिक्षण विभाग व औद्योगिक प्रशिक्षण संस्था वर्धाच्यावतीने ईलेक्ट्रीक, वेल्डींग या विषयावरील प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्हा कारागृहातील 100 बंदींना प्रत्येकी 20 च्या दोन व 30 च्या दोन अशा चार तुकड्यांमध्ये प्रत्येकी तीन महिन्यांच्या प्रशिक्षणाचा यात समावेश आहे.यावेळी आयुक्त श्रीमती लवंगारे यांनी बंदींशी संवाद साधला. प्रशिक्षणाबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी प्रशिक्षण घेतल्यामुळे आम्ही बाहेर पडल्यानंतर चांगल्या प्रकारे रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असे बंदी बांधवांनी सांगितले.
0000