सेलू -/ बालकांचे लैंगिक शोषण रोखणे, त्यांना आपल्या हक्कांची जाणीव करून देणे आणि संभाव्य धोक्यांविषयी सजग करणे, ही केवळ यंत्रणेची नव्हे तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. याच जाणिवेतून सेलू तालुका विधी सेवा समितीच्या वतीने ‘सुरक्षित बचपन’ अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना पोक्सो कायदा, चांगला स्पर्श-वाईट स्पर्श आणि सोशल मीडियाच्या सुरक्षित वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
काल सोमवारी २३ नोव्हेंबर रोजी सेलू येथील यशवंत विद्यालय आणि किनकर इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित जनजागृती कार्यक्रमातून बालसुरक्षेचा महत्त्वपूर्ण संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.
यावेळी सहायक सरकारी अधिवक्ता वैशाली गजभिये यांनी पोक्सो कायदा २०१२, बालकांचे मूलभूत अधिकार तसेच चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यातील फरक विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितला. कोणत्याही प्रकारचा अनुचित अनुभव आल्यास भीती अथवा संकोच न बाळगता पालक, शिक्षक किंवा विश्वासातील व्यक्तींना त्याबाबत सांगणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अन्याय सहन करण्यापेक्षा त्याविरोधात आवाज उठविण्याचे धैर्य बालकांमध्ये निर्माण होणे गरजेचे असल्याचा संदेशही त्यांनी दिला.
🔥आभासी जगातील धोकेही ओळखण्याचे आवाहन
आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वाढता वापर बालकांसाठी संधींसोबतच अनेक धोकेही घेऊन येत आहे. अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क टाळणे, वैयक्तिक माहिती अथवा छायाचित्रे शेअर न करणे आणि सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करणे, याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
अधिवक्ता आर. एस. लिल्हारे यांनी संकटात सापडलेल्या बालकांसाठी उपलब्ध असलेल्या १०९८ या बालसहायता हेल्पलाइनची, तसेच मोफत कायदेशीर मदतीसाठी १५१०० या टोल फ्री क्रमांकाची माहिती दिली. गरज पडल्यास या सुविधांचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय विधी सेवा दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यात आली. सर्वसामान्यांना उपलब्ध असलेले मोफत कायदेशीर सल्ला व सहाय्य याबाबत माहितीपत्रकांचे वितरणही करण्यात आले.
कार्यक्रमाला अधिवक्ता आर. एस. लिल्हारे, सहायक सरकारी अधिवक्ता वैशाली गजभिये, यशवंत विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका व्ही. पी. जगताप, किनकर इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक सुखंडे, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन विधी स्वयंसेवक कु. एस. बी. सोनटक्के यांनी केले, तर समारोपप्रसंगी अमोल पाटील यांनी आभार मानले.
बालकांना सुरक्षित वातावरण देणे, त्यांच्या मनातील भीती दूर करणे आणि स्वतःच्या हक्कांसाठी बोलण्याचे बळ देणे, या दृष्टीने ‘सुरक्षित बचपन’ अभियान महत्त्वपूर्ण ठरत आहे. बालसुरक्षेची जबाबदारी केवळ शाळा किंवा कायद्याच्या चौकटीपुरती मर्यादित नसून, घरापासून समाजापर्यंत प्रत्येकाने ती स्वीकारण्याची गरज या उपक्रमातून अधोरेखित झाली.