🔥दिव्यांगांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; प्रहारचा यंदा जागतिक दिव्यांग दिनावर बहिष्कार.!🔥पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देतांना प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील मिश्रा
सेलू -/ दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, त्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत आणि त्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात या योजनांचा लाभ मिळविताना दिव्यांगांना प्रशासकीय दिरंगाई आणि उदासीनतेचा सामना करावा लागत असल्याचा आरोप प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने केला आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रश्न सुटत नसल्याने संतप्त झालेल्या संघटनेने यंदाच्या जागतिक दिव्यांग दिनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून, यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे.
संघटनेने निवेदनातून दिव्यांगांच्या विविध समस्यांचा पाढाच वाचला आहे. सन २०२४ च्या जागतिक दिव्यांग दिनी तहसीलदारांनी सर्व दिव्यांगांना अंत्योदय रेशन कार्ड लवकरच वितरित करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दोन वर्षांचा कालावधी उलटूनही अनेक दिव्यांगांना अद्याप अंत्योदय रेशन कार्ड मिळालेले नाही. विचारणा केली असता कोटा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
वडगाव (खुर्द) येथील दिव्यांग गजानन वांढरे यांचे घरकुल प्रकरण अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, अद्याप त्यावर निर्णय झालेला नसल्याचे निवेदनात नमूद आहे. पंचायत समितीमार्फत दिव्यांगांना घरकुलाचा लाभ मिळताना प्राधान्य दिले जात नाही. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांगांसाठी घरकुलांचा स्वतंत्र कोटा राखीव ठेवावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
केवळ ग्रामीण भागच नव्हे, तर शहरी भागातील दिव्यांगांचीही घरकुलासाठी परवड होत आहे. सेलू नगरपंचायत आणि सिंदी नगरपरिषद क्षेत्रात घरकुल वाटप करताना दिव्यांगांना प्राधान्य देऊन दरवर्षी काही घरकुले त्यांच्यासाठी राखीव ठेवावीत, अशी मागणी संघटनेने केली आहे.
🔥ग्रामपंचायतींच्या इमारतींमध्ये रॅम्पच नाही.!
ग्रामपंचायतींमध्ये विविध कामांसाठी जाणाऱ्या दिव्यांगांना रॅम्पची व्यवस्था नसल्यामुळे इतरांच्या मदतीने उचलून न्यावे लागत असल्याची गंभीर बाब निवेदनातून समोर आली आहे. दिव्यांगांना स्वावलंबीपणे कार्यालयात प्रवेश करता यावा, यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तातडीने रॅम्पची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
🔥नगरपरिषदेतील गाळे दिव्यांगांच्या वाट्याला कधी?
नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या गाळे वाटपात नियमानुसार दिव्यांगांसाठी काही गाळे राखीव असतानाही अद्याप एकाही दिव्यांग बेरोजगाराला गाळा मिळालेला नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या प्रश्नावर सकारात्मक निर्णय न झाल्यास दिव्यांग बेरोजगार नाईलाजाने आंदोलन करतील आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
दिव्यांग बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी मिळावी, यासाठी झुणका-भाकर केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्यासोबतच शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
🔥दोन वर्षांपासून कृषी साहित्याचा लाभ नाही.!
सन २०२४ मध्ये जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग शेतकऱ्यांना शेतीविषयक साहित्याचे वाटप करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर मागील दोन वर्षांपासून कृषी विभागाकडून कोणत्याही प्रकारचे साहित्य वाटप करण्यात आले नसल्याची तक्रार संघटनेने केली आहे. दिव्यांग शेतकऱ्यांना शेतीविषयक योजनांची माहितीही उपलब्ध करून दिली जात नसल्याने त्यांना शासकीय लाभांपासून वंचित राहावे लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.दिव्यांगांच्या या सर्व मागण्यांवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा यंदाचा जागतिक दिव्यांग दिन तहसील कार्यालयासमोर बहिष्कार आंदोलन करून पाळण्यात येईल, अशी भूमिका सेलू तालुका प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने घेतली असल्याची माहिती तालुकाध्यक्ष सुनिल मिश्रा यांनी दिली आहे.निवेदनावरून दिव्यांगांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाची कार्यपद्धती आणि योजनांच्या अंमलबजावणीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दिव्यांगांना आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष लाभ कधी मिळणार, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.आता आश्वासन नको, हक्काचे लाभ द्या! दिव्यांगांच्या मागण्यांवर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे तालुक्यातील दिव्यांग बांधवांचे लक्ष लागले आहे.(क्रमशः)