🔥गावांचा विकास वाऱ्यावर सोडून कोट्यवधींच्या निधीची खाती रिकामी केल्याचा आरोप
🔥एसआयटी नेमून चौकशीची जनतेतून मागणी,मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल खत्री दाखवणार का तुकाराम मुंढेंसारखा प्रशासकीय बाणा ?
आर्णी -/ गावखेड्यांच्या विकासासाठी केंद्र सरकारने १५ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. मात्र प्रशासक काळात हाच निधी काही ग्राम पंचायत अधिकारी (ग्रामसेवक) आणि प्रशासकांसाठी आर्थिक स्वार्थ साधण्याचे साधन ठरल्याचा गंभीर आरोप होत आहे. ग्रामपंचायतींची मुदत संपल्यानंतर तत्कालीन सरपंचांनाच प्रशासक म्हणून नेमण्यात आले. याच संधीचा फायदा घेत काही ग्राम पंचायत अधिकाऱ्यांनी प्रशासकांशी कथित संगनमत करून १५ व्या वित्त आयोगाच्या निधीची खाती रिकामी केल्याचा आरोप होत आहे.
आर्णी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक काळात निधी शिल्लक राहू नये यासाठीच खर्चाचा सपाटा लावण्यात आला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या, शाळांची दुरवस्था, स्वच्छतेचा बोजवारा आणि मूलभूत सुविधांची वनवा असताना कोट्यवधींचा निधी नेमका कुठे जिरला ? ग्राम पंचायत अधिकाऱ्यांनी गावांचा विकास केला की स्वतःचा आर्थिक विकास साधला हे समजण्या पलीकडे आहे
काही प्रामाणिक ग्रामसेवकांचा अपवाद वगळता अनेक ग्रामसेवकांनी प्रशासक, बांधकाम अभियंते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कथित संगनमतातून शासकीय नियमांना केराची टोपली दाखविल्याचा आरोप आहे. निधी खर्च करण्यासाठी दाखविलेली तत्परता गावांच्या विकासासाठी का दिसली नाही? प्रशासक काळ संपण्यापूर्वीच खाती रिकामी करण्यामागे नेमका कोणता हेतू होता, याचा शोध घेण्याची गरज आहे.
या कथित गैरव्यवहारात ग्रामसेवकांची भूमिका केंद्रस्थानी असल्याने राज्य शासनाने स्वतंत्र विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून चौकशी करावी अशी मागणी जोर धरत आहे .
🔥विशाल खत्री दाखवणार का तुकाराम मुंढेंसारखा प्रशासकीय बाणा ?
जिल्हा परिषद यवतमाळ ला नव्याने रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल खत्री यांनी तुकाराम मुंढे यांच्यासारखी धडक कारवाई करत केवळ आर्णीच नव्हे तर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या आर्थिक कारभाराची झाडाझडती घ्यावी तसेच प्रशासक कलासह मागील 2 वर्षात खाती कशी रिकामी झाली कोणाच्या स्वाक्षरीने झाली, कोणती कामे केली,याची सखोल चौकशी करून दोषींवर निलंबनाची कार्यवाही करावी अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.(क्रमशः)