अमृत सरोवर घोटाळ्याप्रकरणी शेतकऱ्यांसह आत्मदहन करणार!

0

🔥अमृत सरोवर घोटाळ्याप्रकरणी शेतकऱ्यांसह आत्मदहन करणार!

🔥महसूलमंत्री बावनकुळे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलनाचा इशारा; अमोल कोमावार यांचे निवेदन

🔥रेल्वे प्रकल्पाच्या नावाखाली गौण खनिज उत्खनन; ना तलाव तयार झाले, ना शासनाला महसूल मिळाला

प्रतिनिधी यवतमाळ-/ वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पाच्या कामासाठी अमृत सरोवर योजनेच्या नावाखाली गौण खनिजाचे उत्खनन करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविण्यात आल्याचा गंभीर आरोप करीत, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करणारे तक्रारकर्ते अमोल ओमप्रकाश कोमावार यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. अमृत सरोवर योजनेच्या नावाखाली गौण खनिज काढण्यात आले, मात्र त्या ठिकाणी अपेक्षित तलावच निर्माण झाले नाहीत. परिणामी शासनाच्या कागदपत्रांवर १२८ तलाव आणि ५५० कोटी लिटर जलसाठ्याची नोंद असताना प्रत्यक्षात पाण्याचा थेंबही उपलब्ध नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणात तातडीने कारवाई न झाल्यास हिवाळी अधिवेशनादरम्यान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानासमोर अथवा कार्यालयासमोर अन्यायग्रस्त शेतकऱ्यांसह आत्मदहन करण्याचा इशारा कोमावार यांनी दिला आहे.

यासंदर्भात त्यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सविस्तर निवेदन पाठविले असून, यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही या कथित गैरव्यवहाराची तक्रार करण्यात आली आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे कोमावार यांनी निवेदनात म्हटले आहे.

🔥रेल्वे प्रकल्पासाठी अमृत सरोवर योजनेचा वापर?

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची आवश्यकता होती. मात्र, रेल्वे प्रकल्पासाठी उत्खनन करण्याऐवजी अमृत सरोवर योजनेच्या नावाखाली उत्खननाची परवानगी घेण्यात आल्याचा कोमावार यांचा आरोप आहे. अमृत सरोवर योजनेअंतर्गत तलाव खोदताना निघणाऱ्या गौण खनिजावर नियमानुसार रॉयल्टी माफ असल्याचा फायदा घेत संबंधित कंत्राटदारांनी मोठ्या प्रमाणात गौण खनिज काढले. मात्र, त्या उत्खननातून निर्माण होणाऱ्या तलावांचे काम प्रत्यक्षात पूर्णच करण्यात आले नाही. त्यामुळे एकीकडे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला, तर दुसरीकडे जलसंधारणाचे उद्दिष्टही साध्य झाले नाही, असा आरोप करण्यात आला आहे.

🔥शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त; आश्वासनेही हवेत!

उमरखेड तालुक्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतातून गौण खनिज काढण्यात आले. उत्खननानंतर शेतजमीन पूर्ववत करण्यासाठी काळी माती टाकून देण्याचे आश्वासन संबंधित कंत्राटदारांकडून देण्यात आले होते. मात्र, हे आश्वासनही पाळण्यात आले नसल्याचे कोमावार यांनी निदर्शनास आणून दिले आहे. शेतकऱ्यांच्या जमिनींचे नुकसान झाले, त्यांना अपेक्षित मोबदलाही मिळाला नाही आणि आता काही ठिकाणी गौण खनिज उत्खननाच्या प्रकरणात शेतकऱ्यांवरच कारवाई केली जात असल्याचा विरोधाभास त्यांनी उपस्थित केला आहे. उत्खनन करणारे कंत्राटदार आणि त्यांना परवानगी देणाऱ्या यंत्रणेवर कारवाई करण्याऐवजी शेतकऱ्यांनाच कारवाईला सामोरे जावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

🔥५५० कोटी लिटर पाणी गेले कुठे?

अमृत सरोवर योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड तालुक्यात ४३, पुसद ५, नेर ४, दिग्रस ९, दारव्हा २८ आणि यवतमाळ तालुक्यात ३८ अशा तलावांची नोंद शासनाच्या कागदपत्रांमध्ये आहे. या तलावांमधून सुमारे ५५० कोटी लिटर जलसाठा निर्माण झाल्याचे अहवालात नमूद असल्याचा दावा कोमावार यांनी केला आहे. मात्र, प्रत्यक्ष पाहणी केली असता अनेक ठिकाणी तलावच अस्तित्वात नसल्याचे किंवा अपेक्षित जलसाठा निर्माण झालेला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कागदोपत्री निर्माण झालेला ५५० कोटी लिटर पाणीसाठा नेमका कुठे आहे, असा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी चौकशीची मागणी केली आहे. या योजनेअंतर्गत नियम तसेच मार्गदर्शक तत्त्व पायदळी तुडविण्यात आले त्यामुळेच चौकशी करून दोषींवर कारवाई न केल्यास अन्यायग्रस्त शेतकऱ्यांसह हिवाळी अधिवेशनादरम्यान आत्मदहन करण्याचा इशारा अमोल कोमावार यांनी दिला आहे.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!