बोकडं चोरल्याच्या कारणातून मित्रानेच केली मित्राची हत्या
साहसिक न्यूज24
प्रतिनिधी/ वर्धा:
बोकडं चोरल्याच्या संशयातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील खापरी येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी आरोपी मित्रास आज सकाळी गावातूनच ताब्यात घेण्यात आले. सुरेश देवराव आत्राम(वय४२) रा. वनग्राम(चौकी) ता. हिंगणा, जिल्हा नागपूर असे मृतकाचे तर अविनाश वासकर रा. खापरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपी मित्राचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मृतक सुरेश हा आपल्या पत्नी, मुलगा व आईसह चौकी येथे राहत होता. त्याची आई येथील बृहस्पती मंदिराच्या परिसरात पुजा साहित्य विक्री करायची तर सुरेश हा शेती व्यवसाय करायचा. काल बुधवारला तो सकाळी दहा वाजता वर्धा येथील आपल्या मित्राकडे शेतीकामासाठी मदत म्हणून पैसे आणायला गेला होता. तेथून दुपारी तीन वाजता खापरीला परत आला. परंतु रात्री उशिरापर्यंत घरी परतला नसल्याने कुटुंबियांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. फोनवर बेल जात होती, परंतु कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नव्हता. काही वेळानंतर त्याचा मित्र अविनाश वासकर याने फोन उचलला आणि सुरेश हा माझ्या कोठ्याजवळ पडून असल्याचे त्याने कुटुंबियांना सांगितले. लागलीच गावातील काही तरुण रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान घटनास्थळी गेले असता सुरेश हा खापरी येथील नाल्याशेजारी जखमी अवस्थेत पडून असल्याचे आढळले. त्याच्या हातापायावर तसेच पाठीवर मारहाणीच्या जखमा होत्या. त्याला आधी चौकीला व त्यानंतर सावंगी(मेघे) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
मृतक व आरोपी हे दोघेही चांगले मित्र होते. मृतकाचे आरोपीच्या घरी नेहमीच जाणे-येणे सुद्धा होते. आरोपीचे काही दिवसांपूर्वी दोन बोकडं चोरीला गेले होते. या संशयातूनच त्याने काल सुरेशला आपल्या गोठ्यात दारु पिण्यासाठी बोलावले व नंतर त्याला मारहाण करून त्याची हत्या केल्याची तक्रार सुरेशच्या आईने पोलिसांत दाखल केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. याप्रकरणी पोलिसांत आरोपी अविनाशवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने रात्रभर खापरी तसेच जंगल परिसरात आरोपीचा शोध घेतला. तेव्हा तो गावातच अचानक सकाळी सात वाजताच्या सुमारास पोलिसांना मिळाला असता त्याला ताब्यात घेत अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुरेश कोहळे पुढील तपास करीत आहे.