सरकार मेहरबान, दिवाळीत गोडधोड खावून घ्या!
साहसिक न्युज24
मुंबई / रेशनकार्ड धारकांसाठी चांगली बातमी आहे. बंडखोरीमुळे नकारात्मक प्रसिद्धी पावलेल्या राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने यंदाच्या दिवाळीत गोडधोड खाण्याची सोय केली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार, शिधापत्रिकाधारकांना केवळ शंभर रुपयांमध्ये दिवाळीमध्ये लागणार्या किराणा वस्तूंचे पॅकेज मिळेल. रवा, हरभरा डाळ, साखर व तेल याचे प्रत्येकी एक किलो पॅकेज केवळ शंभर रुपयांत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते.
राज्य सरकारच्या निर्णयानुसार, या पॅकेजमध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना प्रती एक किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल याचा समावेश असेल. राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे ७ कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. हा संच एक महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येऊन त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्धारे करण्यात येईल. यासाठी येणार्या एकूण ५१३ कोटी २४ लाख खर्चास देखील राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या शिधावस्तूंचा संच दिवाळीपूर्वी वाटप व्हावा, त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नये, याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
१०० रुपयांत नेमकं काय काय मिळणार?
एक किलो साखर
एक किलो रवा
एक किलो चणाडाळ
एक लीटर तेल