सिंदीच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरांचा धुमाकूळ
🔥 सिंदीचा भाजीबाजार की मोबाईल चोरांचा बाजार
🔥 नेहमीच आठवडी बाजारातून चोरीला जातात दोन-चार मोबाईल
🔥 आठवडी बाजारात पोलिसांनी गस्त लावण्याची मागणी
सिंदी (रेल्वे) : येथील आठवडी बाजारात हल्ली चोरीचे सत्र वाढले आहे. या आठवडी बाजारात गत काही महिन्यांपासून मोबाईल चोरांनी धुमाकूळ घातला आहे. गर्दीचा फायदा घेत चोरटे बाजारासाठी आलेल्या नागरिकांच्या खिशावर देखील डल्ला मारत आहे. दर आठवड्याला नागरिकांचे महागडे मोबाईल चोरीला जाणे ही बाब नित्याचीच झाली आहे. त्यामुळे आठवडी बाजारात पोलिसांनी साध्या वेशात गस्त लावून मोबाईल चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सिंदी शहरात मागील अंदाजे 40 वर्षांपासून गुरुवारी नंदी चौक ते जुने पोलीस स्टेशन तसेच त्याच परिसरातील गल्लीबोळात आठवडी बाजार भरतो. या आठवडी बाजारात लगतच्या किमान 23 गावातील नागरिक या आठवडी बाजारात सकाळपासून तर सायंकाळपर्यंत विविध वस्तू तसेच भाजीपाला खरेदी करण्यासाठी येतात. मात्र, या गल्लीबोळात जागा अपुरी असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. नेमके त्याच गर्दीचा फायदा घेत आठवडी बाजारात फिरणाऱ्या मोबाईल चोरट्यांची बाजारात येणाऱ्या नागरिकांवर करडी नजर असते. भाजीपाला खरेदी करण्यासाठी ग्राहक खाली बसला की, गर्दीत धक्का देऊन ते शर्टच्या किंवा पॅन्टच्या खिशातून मोबाईल हातोहात लंपास करून पसार होतात. मोबाईल चोरी झाल्याचे लक्षात येताच संबंधित नागरिक स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेतात. मोबाईल परत मिळणार नाही, याची खात्री असली तरी पुढील अडचणी नकोत किंवा तोच मोबाईल क्रमांक मिळावा यासाठी अनेकजण पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावतात. मात्र, त्यांना तेथे पोलीसांकडुन व्यवस्थित सहकार्य मिळत नसल्याने तक्रार देण्यासाठी गेलेल्या नागरिकांना गेल्या पावली माघारी फिरावे लागते. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे सिंदीचा भाजीबाजार की मोबाईल चोरांचा बाजार? असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे. परिणामी, सिंदी पोलिसांनी गुरुवारी आठवडी बाजारात साध्या वेशात गस्त लावून मोबाईल चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मोबाईलचा तपास लागतच नाही
आठवडी बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचे मोबाईल चोरट्यांकडून पळविले जातात. याप्रकरणी पीडित सिंदी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जातात. दरम्यान, उपस्थित पोलीस कर्मचारी त्या तक्रारदारास नानाविविध प्रश्न विचारून ऑनलाईन तक्रार देण्याचा सल्ला देतो. तक्रार केल्यानंतर यातील जवळपास मोबाईलचा शोधच लागत नसल्याचा तक्रारदारांना अनुभव आहे. तक्रार केल्यानंतर महिना, दोन महिन्यांनंतर नागरिकही पाठपुरावा करीत नाहीत. केला तरी ते हतबल ठरतात.
दिनेश घोडमारे साहसिक न्यूज-24