१६ वर्षीय कामगाराचा विजतारांचा स्पर्श झाल्याने मृत्यू.
लाडकी रेल्वे गेट रस्ता निर्मिती कामाचेवेळी झाला अपघात
हिंगणघाट : तालुक्यातील लाडकी ते नागरी रस्त्याचे सर्व्हेक्षण तसेच रस्त्याचे मोजमापाचे काम सुरू असताना वरून जाणाऱ्या हाय टेन्शन लाईनला स्पर्श झाल्याने एका कामगाराचा आज दि.३० रोजी सकाळी १० वाजता चे दरम्यान मृत्यू झाला.
या भागात बांधकाम विभागाचे रस्ता बांधण्याचे विकास कार्य सुरू असताना आज हा दुर्दैवी प्रकार घडला.
या भागात रस्त्याने जाणारी विजवाहक तार ठरवून दिलेल्या अंतरापेक्षा खुपच खाली लोंबकळत असल्याने मजुराचे हाती असलेल्या मोजमाप करणाऱ्या यंत्राचा स्पर्श झाल्याने हा दुदैवी प्रकार घडला. विजमंडळाचे अधिकाऱ्यांचे दुर्लक्षितपणाचाच हा प्रकार म्हणावा लागेल, या विजवाहक तारा जर अधिक उंचीवर असत्या तर हा अपघात टळला असता अशी माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर कामगारांनी दिली.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील नागरी येथील रहिवासी मृतक रोहित विलास मोहिते(१६) हा गेल्या ८ दिवसापासून या रस्त्याचे पेटी कॉन्ट्रॅक्टर रुचिका बिल्डकॉन या कंपनीत कामावर होता.
आज कंपनीच्या इंजिनीयर व इतर कर्मचाऱ्यांच्या वतीने मोजमाप करताना वरती जवळच असलेल्या हाय टेन्शन लाईनला स्पर्श होऊन त्याचा करंट लागून घटनास्थळीच मृत्यू झाला.घटनेची माहिती हिंगणघाट पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
कंपनीचेवतीने या कामगाराचे वय २० वर्षे सांगण्यात येत असले तरी तो कामगार हाती आलेल्या पुराव्यानुसार त्या मृत कामगाराचे वय १६ वर्ष आहे. मृत कामगाराचे वडीलाचा यापूर्वीच मृत्यु झाला असून त्याचे मागे २ बहिणी व आई असा आप्त परिवार आहे.
या अल्पवयीन कामगाराचा मृत्यु झाल्यानंतर त्याचे परिवारातील सदस्यांनी कंपनीकडून नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज-24 हिंगणघाट