🔥दलित युवक प्रीतम सहारेला अर्धनग्न करून केली होती मारहाण.
🔥दखलपात्र गुन्हा असतांना सिंदी पोलिसांनी केली होती अदखलपात्र गुन्ह्याची नोंद.
🔥पोलिसांना तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे दिले आदेश.
सिंदी (रेल्वे) /शाळकरी अल्पवयीन मुलींची छेड काढून अश्लील चाळे केल्या प्रकरणी आरोपी प्रीतम सहारे विरुद्ध पोलिसांनी पोस्को व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र,प्रीतम सहारे या दलित युवकाला संतप्त नागरिकांनी तसेच काही शिक्षकांनी बेदम मारहाण करून अर्धनग्न धिंड काढली. हा दखलपात्र गुन्हा असतांना सुद्धा सिंदी पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. याबाबत आरोपीची पत्नी दीपाली सहारे यांनी पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल केली. परंतु, पोलिस अधीक्षकांनी सुद्धा आरोपींवर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे दीपाली सहारे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. शेवटी उच्च न्यायालयाने त्या प्रकरणाची दखल घेत पोलिसांना तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहे.29 डिसेंबर 2023 रोजी सकाळी येथील केसरीमल नगर विद्यालयाच्या अल्पवयीन मुलींची छेड काढून अश्लील चाळे केल्याच्या संशयावरून आरोपी प्रीतम सहारे याला संतप्त नागरिकांनी तसेच काही शिक्षकांनी अंगावरील कपडे फाटतपर्यंत अमानुष, बेधमपणे मारहाण केली. एवढेच नाही तर आरोपीची शहरात मुख्य रस्त्याने बाजारपेठेतुन अर्धनग्न धिंड काढत पोलीस ठाण्यात नेले. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते. याप्रकरणी सिंदी पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आरोपी प्रीतम सहारे यांच्याविरोधात विनयभंग तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या कलम 12 नुसार कारवाई करून अटक केली होती. परंतु, दुसरीकडे आरोपी प्रीतम याला अमानुष, बेधम मारहाण करून अर्धनग्न धिंड काढणाऱ्या आरोपीविरुद्ध ठाणेदार वंदना सोनूले यांनी गंभीर स्वरूपाचा दखलपात्र गुन्हा असतांना सुद्धा राजकीय दबावातून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. याबाबत आरोपीची पत्नी दीपाली सहारे हिने दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी आरोपी खुशाल बोरकर, प्रवीण वाघमारे, विनायक सोनटक्के, राहुल गवळी, गजानन घोडे, अनिल चांदेकर, अमोल गवळी, प्रदीप कनोजे, अनिल साखळे, विजय बीजवार, अमोल राधेश्याम गवळी, प्रवीण मुळे व विलास येखंडे अधिक 15 ते 20 आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करून अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी पोलीस अधीक्षक नुरुल हसन वर्धा यांना लेखी तक्रारीतून केली. परंतु, पोलीस अधीक्षक हसन यांनी सुद्धा आरोपींवर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे दीपाली सहारे यांनी दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी उच्च न्यायालय नागपूर येथे धाव घेतली. याचिकाकर्ता यांचेकडून वकील सुमित जोशी यांनी युक्तिवाद केला. परिणामी, उच्च न्यायालयाने त्या प्रकरणाची दखल घेत पोलीस अधीक्षक वर्धा, उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा तसेच ठाणेदार पोलीस स्टेशन सिंदी (रेल्वे) यांना तीन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायमूर्ती विनय जोशी व वृषाली जोशी यांनी दिले आहेत. त्यामुळे उच्च न्यायालय, नागपूर या प्रकरणी दोषी आरोपींवर पुढे काय कारवाई करणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
🔥स्थानिक गुन्हे शाखा वर्धा पोलीस यांनीही केली मारहाण.🔥
आरोपी प्रीतम सहारे याला जिल्हा न्यायालयाने 21 दिवसानंतर जामीन मंजूर केला. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने प्रीतम सहारे याला कलम 111 सीआरपीसी अन्वये गुन्हा दाखल करून 50 हजाराच्या एका जामीनदारासह विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. वर्धा येथे हजर राहण्याचे सूचना पत्र दिले. त्यानुसार आरोपी हा 8 फेब्रुवारी 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा येथे गेला असता पोलिसांनी साक्षीदाराला अभद्र शिवीगाळ करून आरोपी प्रीतमचे हातपाय बांधून तेथेही सुंदरी पट्ट्याने अमानुष मारहाण केली. या प्रकाराची सुद्धा तक्रार 12 फेब्रुवारी 2024 रोजी प्रीतम सहारे यांनी पोलीस अधीक्षक वर्धा यांच्याकडे केली आहे.