🔥उमेश वावरे यांच्या नेतृत्वात नायब तहसिलदारांना नागरिकांचे निवेदन.🔥शैक्षणिक कर्ज कमी देऊन फसवणूक केल्याचा आरोप.🔥शाखा व्यवस्थापकाने शिवीगाळ करून केला अभद्र व्यवहार.
सिंदी (रेल्वे) -/ येथील बँक ऑफ इंडियाचा कारभार चव्हाट्यावर आला असून शैक्षणिक कर्ज कमी देऊन फसवणूक तसेच शिवीगाळ करून ग्राहकांसोबत अभद्र व्यवहार करणाऱ्या बँक ऑफ इंडिया शाखा सिंदीचे व्यवस्थापक मयूर वायकर यांची हकालपट्टी करण्याची मागणी उमेश वावरे (वैज्ञानिक) यांच्या नेतृत्वात नागरिकांनी नायब तहसीलदार यांना निवेदनातून केली आहे.
भीमराव फुलमाळी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा मुलगा सिद्धांत भिमराव फुलमाळी याला पी.जी.डी.एम. या कोर्स करीता आय.आय.ई.बी.एम. पुणे या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे. सदर कॉलेजच्या फी करिता ८,०५,०००/- रूपये इतकी फी आहे. फुलमाळी हे एकावेळेस संपूर्ण फी भरू शकत नसल्यामुळे त्यांनी बँक ऑफ इंडीया शाखा सिंदी (रेल्वे) येथे रितसर अर्ज केला. फुलमाळी यांच्यावर कोणत्याही बँकेचे कोणतेही कर्ज नाही. तरी सुद्धा सदर बँकेच्या व्यवस्थापकाने बँकेत फुलमाळी यांच्यासोबत अभद्र व्यवहार व शिवीगाळ केली. एवढेच नाही तर फुलमाळी यांना बँकेतून हाकलून देण्याची धमकी देत उर्मट भाषेचा वापर केला. कॉलेजमध्ये मुलाची फी भरण्याची फुलमाळी यांना पैशाची अत्यंत गरज असतांना सुद्धा त्यांना कर्ज मिळण्यासाठी दोन महिन्यांपासून टाळाटाळ करीत होते. सरतेशेवटी शाखा व्यवस्थापक वायकर यांनी मानसिक त्रास देत फुलमाळी यांना ८,०५,०००/- रूपये शैक्षणिक कर्ज न देता जाणूनबुजुन ७,११,०००/- रूपयांचेच कर्ज मंजूर केले. त्यामुळे उर्वरीत ९४,०००/- रूपये फी भरण्याचे आर्थिक संकट फुलमाळी यांच्यावर ओढवले आहे.
फुलमाळी यांची आर्थिक परिस्थिती हलाकीची असून रोजमजुरी करून आपला कुटुंबाचा परपंच चालवतात. त्यामुळे उर्वरीत मुलाच्या कॉलेजची फी कशी भरावे? हा त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला. सर्वांनाच शैक्षणिक कर्ज कॉलेजच्या कोटेशन प्रमाणे मंजूर केले आहे व तसा शासनाचा उपक्रम सुद्धा आहे परंतू शाखा व्यवस्थापकाने ही परिस्थिती भीमराव फुलमाळी यांच्यावर हेतूपुरस्सर आणली असा त्यांचा आरोप आहे.
बँकेचे व्यवस्थापक मयूर वायकर हे ग्राहकांसोबत नेहमीच अश्याप्रकारचा अभद्र व्यवहार करताना दिसतात. परिणामी, या बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापकावर योग्य ती कार्यवाही करून त्यांची येथून हकालपट्टी करून ग्राहकांशी सौजन्याने वागणारा नविन व्यवस्थापक येथे रुजू करावा अश्या आशयाचे निवेदन वैज्ञानिक उमेश वावरे यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार सिंदी मधुकर ठाकरे यांना दिले आहे.