वर्धा -/अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केल्याबद्दल इंटलेक्चुअल सोसायटी ऑफ मीडिया प्रमोटर (आयएसएमपी) संस्थेने चितमपल्ली यांचे अभिनंदन केले आहे.प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार मिळाले आहेत. यात चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. वन संरक्षण, विकास आणि संशोधन या क्षेत्रात ते सहा दशकांपासून कार्यरत आहेत. ते वर्धेतील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात तीन वर्षांहून अधिक काळ वास्तव्यास होते.मारुती चित्तमपल्ली यांनी वन खात्यात 36 वर्षे सेवा केली आहे. त्यांनी 1975-76 या वर्षात गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव राष्ट्रीय उद्यानाचा विकास केला. सुप्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ सलीम अली यांच्या सहकार्याने त्यांनी कर्नाळा पक्षी अभयारण्य विकसित करण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. आतापावेतो 5 लाख किमी एवढी भटकंती करुन त्यांनी वृक्ष, पक्षी, प्राणी यांची माहिती गोळा केली व साहित्य तसेच जंगल अनुभवांवर 23 पुस्तके लिहिली. 13 बोली-भाषांचे जाणकार चितमपल्ली यांनी आदिवासी व इतर जमातींशी संवाद साधत अत्यंत दुर्मिळ माहितीचा खजिना संकलित करून मराठी साहित्य विश्वात एक लाखाहून अधिक शब्दांची भर घातली. सोलापूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्याकडे अनेक वर्षांपासूनच्या दैनंदिनी असून त्यात विविध प्रकारच्या नोंदी करुन ठेवल्या आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र सरकारने तसेच अनेक सामाजिक संस्थांनी त्यांना सन्मानित केले आहे. तीस हून अधिक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांनी पक्षिकोश, प्राणिकोश व मत्स्यकोश लिहून कोश निर्माण कार्यात मोठा ठसा उमटवला आहे. त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे वन्य जीव संरक्षक व आय एस एम पी चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कौशल मिश्र, डॉ. राजेन्द्र जैन, बी एस मिरगे, एड. नीलकंठ हूड, एड. ताम्रध्वज बोरकर, यशवंत भांडेकर, नीलिमा मुनोत, अनिल पोखरे, दिव्या, प्रिया यांनी अभिनंदन केले आहे.