Eknath Shinde New Chief Minister of Maharashtra: एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

0

Byसाहसिक न्युज 24
मुंबई:
एकनाथ शिंदेहे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात बंडखोरी करुन भाजपसोबत जाणे पसंत केले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीपासूनच दावा केला होता की, शिवसेनेचे बहुतांश आमदार आमच्यासोबत आहेत. अखेर राज्याच्या मुख्यमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे.

विधानसभा निवडणूक 2019 मध्ये शिवसेना भाजप युती द्वारे निवडणुकीला सामोरे गेले. पुढे मुख्यमंत्री पदावरुन दोन्ही पक्षांचे बिनसले. शिवसेना भाजप युती निवडणुकीनंतर तुटली. शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी नवी महाविकासआघाडी उदयास आली. ही आघाडी उदयास आल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हिंदुत्त्व सोडले अशी टीका होऊ लागली होती. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अत्यंत संयत कारभार करणारे व्यक्तीमत्व अशी ओळख निर्माण केली होती. (हेही वाचा, Devendra Fadnavis, Eknath Shinde Swearing Ceremony: एकनाथ शिंदे मुंबईत दाखल; देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आजच शपथविधी पार पडण्याची शक्यता)

दरम्यान, राज्यसभा आणि त्यापाठोपाठ विधानपरिषद निवडणूक झाली. या निवडणुकीत सत्तेत असलेल्या महाविकासआघाडी सरकारकडे बहुमत असतानाही भाजपचा विजय झाला. राज्यसभेला शिवसेनेच्या विजय पवार यांचा तर विधानपरिषदेत काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. त्यानंतर नाट्यमय घटना घडल्या. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आमदार मोठ्या प्रमाणावर सूरतला पोहोचले. पुढे हे सर्व आमदार गुवाहाटीला पोहोचले.

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे मोठ्या प्रमाणावर कायदेशीर पेच निर्माण झाले. प्रकरण न्यायालयात गेले. त्यावर सुनावणी झाली. अद्यापही अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबीत आहेत. दरम्यान राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याच्या दिलेल्या आदेशानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!