🔥हेच ते एलसीबी पीआय सतीश चवरे यांच्या ‘कृपेने’ सुरु आहे हायप्रोफाईल जुगार क्लब!
🔥हाच तो पीआय चवरेंच्या अभय हस्तकांचा व्हीडिओ व्हायरल; थेट पोलिसांचीच पत्ते पिसण्यात ‘ड्युटी’🔥हेच ते यवतमाळात कायद्याचे ‘तीन पत्ते’ / पोलीसच बनले जुगाराचे रखवालदार
🔥दै.’साहसिक’च्या हाती लागला थेट व्हीडिओ पुरावा!
यवतमाळ -/ कायद्याचे रक्षण करणारेच जेव्हा गुन्हेगारांचे भागीदार बनतात, तेव्हा गुन्हेगारीला रोखणार तरी कोण? असा संतप्त सवाल सध्या यवतमाळकरांमधून विचारला जात आहे. यवतमाळ-धामणगाव रोडवरील अन्नपूर्णा बारसमोर कोपरा येथील एक आणि यवतमाळ शहरातील दोन अशा तीन उच्चभ्रू भागीदारांनी थेट स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक (PI) सतीश चवरे यांच्याकडून ‘खास परवानगी’ घेऊन एक हायप्रोफाईल जुगार क्लब सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या बेकायदेशीर आणि भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करणारा एक खळबळजनक व्हीडिओ आज ‘दै. साहसिक’ च्या हाती लागला आहे. या व्हीडिओमुळे भ्रष्ट पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांचा काळवंडलेला चेहरा संपूर्ण जिल्ह्यासमोर उघडा पडला आहे. आता यापेक्षा आणखी कोणता भक्कम पुरावा वरिष्ठ अधिकाऱ्यांना हवा आहे, असा रोखठोक सवाल या बातमीच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. यवतमाळ शहरात सध्या अशाच प्रकारचे तब्बल पाच मोठे हायप्रोफाईल जुगार क्लब राजरोसपणे सुरू आहेत. या क्लबची मस्ती इतकी वाढली आहे की, रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी या क्लबवर कारवाई करायचे सोडून थेट टेबलवर बसून पत्ते पिसताना दिसू लागले आहेत! “हा क्लब आमच्या साहेबांचाच आहे, तुम्हाला काय करायचे ते करा,” अशी धमकीवजा उद्दाम भाषाही हे पोलीस कर्मचारी आणि क्लब चालकांकडून वापरली जात आहे. कायद्याची रक्षक असलेली पोलीस यंत्रणाच आता जुगार माफियांचे रक्षणकर्ते बनल्याने यवतमाळ पोलीस दलाची पत वेशीवर टांगली गेली आहे. दिवसा आणि रात्रभर अविरत चालणाऱ्या या जुगार क्लबमध्ये येणाऱ्या जुगार्यांसाठी अगदी राजाश्रयासारखी खास ‘बडदास्त’ राखली जात आहे. बाहेरच्या जिल्ह्यांतून आणि शहरांतून मोठ्या असामींना या क्लबकडे आकर्षित करण्यासाठी आलिशान गाड्या, दारू, आणि इतर अमली पदार्थांची मोफत सोय केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. या जुगार क्लबमधून दररोज कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर उलाढाल होत असून, त्यातील एक मोठा ‘हप्ता’ थेट एलसीबी प्रमुख सतीश चवरे आणि त्यांच्या खास मर्जीतील पोलीस कर्मचाऱ्यांच्या खिशात जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे.
जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी एलसीबी (स्थानिक गुन्हे शाखा) ही अत्यंत महत्त्वाची शाखा मानली जाते. परंतु, सतीश चवरे यांच्या नेतृत्वात ही शाखा केवळ ‘हप्ते वसुली केंद्र’ बनल्याची चर्चा आता पोलीस वर्तुळातच सुरू झाली आहे. एकीकडे सर्वसामान्यांवर किरकोळ कारवायांचा धडाका लावणारे पोलीस प्रशासन, पोलीस निरीक्षकांच्या थेट छत्रछायेत चालणाऱ्या या भव्य जुगार अड्ड्यांकडे कानाडोळा का करत आहे? ’दै. साहसिक’ कडे उपलब्ध झालेला व्हीडिओ हा चवरे यांच्या भ्रष्ट कारभाराचा जिवंत दस्तऐवज आहे. या पुराव्यानंतर तरी राज्याचे गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि यवतमाळचे पोलीस अधीक्षक सतीश चवरे यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करणार का? की भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घालून यवतमाळला जुगार माफियांच्या हवाली करणार? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. यवतमाळच्या शांततेला सुरुंग लावणाऱ्या या बेकायदेशीर जुगार अड्ड्यांचा आणि त्यांच्या खाकी पाठीराख्यांचा बुरखा फाडणे ‘दै. साहसिक’ असेच सुरू ठेवेल. पुरावे सादर झाले आहेत, आता प्रतीक्षा आहे ती फक्त कडक कारवाईची!(क्रमशः)