🔥यवतमाळात १४ वर्षीय शाळकरी मुलाचे अपहरणाचा अन् विनयभंगाचा प्रयत्न; शहर पोलिसांत ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल.
🔥धक्काबुक्कीच्या क्षुल्लक कारणावरून थेट गाडीत कोंबण्याचा प्रयत्न | पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा (MH-29-CR-4141) कारचालकाचे विकृत कृत्य | प्रसंगावधानाने मुलगा बचावला.
यवतमाळ -/ रस्त्याने जाताना अनावधानाने लागलेल्या धक्काबुक्कीच्या क्षुल्लक कारणावरून एका १४ वर्षीय शाळकरी मुलाला अर्वाच्च शिवीगाळ करत त्याचा विनयभंग करण्याचा आणि जबरदस्तीने चारचाकी गाडीत डांबून पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळ शहरात उघडकीस आला आहे. या घटनेने शहर व परिसरात खळबळ उडाली असून यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात इनोव्हा कारच्या चालकासह त्याच्या साथीदाराविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि ‘पोक्सो’ (POCSO) कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवतमाळ शहरातील भोसा रोड, प्रभात नगर येथील रहिवासी व विवेकानंद विद्यालयात इयत्ता १० वीत शिकणारा १४ वर्षीय विद्यार्थी २३ जून रोजी दारव्हा रोडवरील कोल्हे सभागृहाजवळून जात असताना, गर्दीत अनावधानाने त्याचा धक्का एका अनोळखी इसमाला लागला. या क्षुल्लक कारणावरून संबंधित इसमाने मुलाला व त्याच्या मृत वडिलांबद्दल अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर तो इसम तेथून पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा गाडीत (क्रमांक MH-29-CR-4141) बसून निघून गेला.यानंतर ९ जुलै आणि १७ जुलै रोजी अलअमीन ले-आऊट व लखन धाबा (डोर्ली-कळंब रोड) परिसरात सदर पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडी पुन्हा त्या मुलाच्या नजरेस पडली. गाडीतील चालकाने मुलाला पाहून गाडी खाली उतरवून त्याला थांबवले व पुन्हा शिवीगाळ केली.एवढ्यावरच न थांबता, विकृत मनोवृत्तीच्या या कारचालकाने मुलाची कॉलर पकडून त्याला जबरदस्तीने गाडीत ओढण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्याने मुलाच्या गुप्तांगाला घट्ट पकडून अश्लील स्पर्श करत अत्यंत वेदनादायक कृत्य केले. घाबरलेला मुलगा जोराने ओरडू लागला असता, आरोपीने गाडीतील आपल्या ‘नितीश’ नावाच्या साथीदाराला आवाज देऊन मुलाला बळजबरीने गाडीत टाकायला सांगितले.आरोपींच्या तावडीतून सुटण्यासाठी मुलाने प्रचंड हिंमत दाखवत आरोपीच्या हाताला जोराचा झटका दिला आणि तेथून पळ काढला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेमुळे प्रचंड धास्तावलेल्या मुलाने घरी जाऊन आपल्या कुटुंबातील विश्वासू सोहनसिंह सोलंकी (रा. दत्त चौक, यवतमाळ) यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला.मुलाच्या पाठीवर वडिलांचे छत्र नसल्याने आणि आई मजुरी करत असल्याने कुटुंबात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर नातेवाईकांच्या मदतीने यवतमाळ शहर पोलीस ठाणे गाठून आरोपींविरोधात जबानी रिपोर्ट नोंदवण्यात आला. पोलीस ठाण्यात तक्रारीवरून इनोव्हा गाडी क्र. MH-29-CR-4141 चा चालक व त्याच्या साथीदाराविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५२, ३५१(२)(३) सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा, २०१२ च्या कलम ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून संशयित आरोपींचा शोध सुरू आहे.(क्रमशः)