पशुसंवर्धनच्या योजनांचा आता मोबाईल ॲपद्वारे मिळणार लाभ
प्रतिनिधी / वर्धा :
ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतक-यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्यावतीन विविध योजना राबविण्यात येते. या योजनांचा शेतक-यांना लाभ देण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्याची योजना सुरु केली आहे. सदर योजनेसाठी शेतक-यांना संकेतस्थळासोबतच मोबाईल ॲपव्दारे अर्ज करता येणार आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी दिनांक १८ डिसेंबरपर्यंत संकेतस्थळावर किंवा मोबाईल ॲपव्दारे अर्ज करावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
पशुसंवर्धन विभागाच्यावतीने वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण योजनेमध्ये गेली तीन वर्षे ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरु करण्यात आली आहे. आता याबरोबरच जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामध्ये एखाद्या योजनेकरीता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये यासाठी तयार केलेली प्रतिक्षायादी पुढील ५ वर्षापर्यंत लागू राहणार आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून त्यांना प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळणार हे कळणार असल्याने लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबीकरीता नियोजन करता येणार आहे.
त्यामुळे नाविण्यपूर्ण योजने अंतर्गत दुधाळ गाई-म्हशीचे गट वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, १ हजार मासल कुकुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय देणे, 1०० कुकुट पिलांचे वाटप व २५ अधिक ३ तलंगा गट वाटप या योजनेसाठी शेतक-यांनी https://ahmahabms.com या संकेतस्थळावर किंवा मोबाईल वरुन AH-MAHABMS या ॲप वरुन अर्ज दाखल करावा. अधिक माहितीसाठी १९६२ किंवा १८००-233-०४१८ या टोल फ्री क्रमांकावर किंवा संबंधित पशुसंवर्धन विकास कार्यालयाशी संपर्क साधावा, असे पशुसंवर्धन विभागाने कळविले आहे.