पुलगावात अतिक्रमीत जुनी भाजी मंडीवर चालला बुलडोजर

0

साहसिक न्युज24
प्रतिनिधी/ पुलगाव:
पुलगाव कॅम्प रोडवरील जुनी भाजी मंडीवर आज सकाळी नगरपालिका प्रशासनाकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. नप मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
स्टेशन जवळच्या भाजी मंडीतील दुकानधारकांना नगरपालिकेने आठवडी बाजारातील नवीन संकुलामध्ये दोन वर्षापूर्वी गाळे दिले होते. मात्र, भाजी विक्रेत्यांनी या गाळ्यांचा फक्त ताबा घेतला होता. प्रत्यक्षात मात्र, जुनी भाजी मंडीत ते भाजीचे गोडाऊन उभे करून व्यवसाय करीत होते. ही जागा खाली करण्यासाठी नप प्रशासनाने व्यावसायिकांना नोटीसा बजावली होती. परंतु, जागा खाली करून न दिल्याने आज सकाळी नगरपालिकेने अतिक्रमण हटावची कारवाई करीत ही जागा आपल्या ताब्यात घेतली असल्याचे नप अधिकार्‍यांनी सांगितले.
अर्धा एकर जागेवर 15 ते 20 शेड उभे करण्यात आले होते. हे शेड बुलडोजरच्या साहाय्याने तोडण्यात आले.
यासोबतच नदीकाठाजवळ राम मंदिर समोर गॅस गोडाऊनजवळ टिबडीवाल यांचे शेत होते. 2.5 हेक्टर असलेली ही जागा नगरपालिका प्रशासनाने कोर्टात जिंकली. या जागेवर नगरपालिकेचे अधिकारी ताबा घेण्यासाठी आले. मात्र, सोयाबीन पीक असल्याने त्याठिकाणी नगर परिषदेची जागा असल्यासंबंधीचा फलक लावण्यात आला.
या कारवाईत नगरपालिका प्रशासकीय अधिकारी अमर बागरे, नगर रचनाकार शाहरूख शेख, अभियंता नितीन जैस्वाल, अभियंता रूपेश नवलाखे, मनोज खोडे, चंद्रकांत ईश्‍वरकर, सतीश मसराम, प्रज्ञा उराडे, रवी पतालिया, संजय वानखेडे आदी कर्मचारी व पोलिस उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!