पोक्सो’च्या आरोपीला खाकीचेच अभय! यवतमाळ ग्रामीण पोलिसांकडून तक्रारदार पक्षकाराचाच छळ;दोन महिन्यांनंतरही आरोपी मोकाट

0

🔥पोक्सो’च्या आरोपीला खाकीचेच अभय! यवतमाळ ग्रामीण पोलिसांकडून तक्रारदार पक्षकाराचाच छळ;दोन महिन्यांनंतरही आरोपी मोकाट

🔥’तू काळजी करू नको, मी मॅनेज करतो’; पोक्सो गुन्ह्यात ठाणेदारांचे आरोपीला आश्वासन? तक्रारदार कुटुंबावर जीवघेणा तणाव, वरिष्ठही मूग गिळून गप्प

​यवतमाळ -/ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणाऱ्या अत्यंत संवेदनशील ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊन दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला, तरीही मुख्य आरोपी मोकाटच असल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील तक्रारदार असलेले पक्षकार दिगंबर अवथळे आणि त्यांच्या कुटुंबालाच पोलिसांकडून मानसिक व शारीरिक छळाला सामोरे जावे लागत आहे. ठाणेदार पोलीस निरीक्षक प्रविण मानकर आणि तपास अधिकारी उपनिरीक्षक विजयमाला रिठे यांनी संगनमत करून आरोपीला पाठीशी घातल्याचा आणि तपासाची गोपनीय माहिती पुरवल्याचा गंभीर आरोप तक्रारदाराने केला आहे.

​एकीकडे महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी शासन कठोर कायद्यांची अंमलबजावणी करत असताना, यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकारी मात्र ‘पोक्सो’सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला उघडपणे अभय देत असल्याचा खळबळजनक आरोप झाला आहे. वाटखेड (ता. यवतमाळ) येथील रहिवासी असलेले पक्षकार दिगंबर राघोजी अवथळे यांनी याप्रकरणी वरिष्ठांकडे तक्रार करत दोषी पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची आणि बडतर्फीची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे यवतमाळच्या पोलीस दलातील कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दिनांक ५ सप्टेंबर २०२६ रोजी यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ०४५१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४, ७५, ३३३ आणि पोक्सो कायदा कलम १२ अंतर्गत अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कायद्यानुसार अशा प्रकरणांमध्ये तात्काळ तपास करून आरोपीच्या मुसक्या आवळणे अपेक्षित असते. मात्र, गुन्हा दाखल होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही. उलटपक्षी, तपासाची चक्रे उलट्या दिशेने फिरवून पीडित कुटुंबावरच दबाव आणला जात असल्याचा आरोप अवथळे यांनी केला आहे.

तक्रारदार दिगंबर अवथळे यांनी दिलेल्या निवेदनात ठाणेदार पोलीस निरीक्षक (PI) प्रविण मानकर आणि तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक (IO PSI) विजयमाला रिठे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “ठाणेदार मानकर यांनी आमच्यासमोरच फोन लावून तसेच तपास अधिकारी रिठे यांनी वारंवार खोटे बोलून आरोपीला तपासाची गोपनीय माहिती पुरवली. इतकेच नव्हे तर, ‘तू काळजी करू नकोस, मी सर्व मॅनेज करतो,’ असे आश्वासन देऊन आरोपीला अभय दिले जात आहे,” असे अवथळे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. ​पोलीस अधिकाऱ्यांकडून साक्षीदारांना धमकावणे आणि तपासात जाणीवपूर्वक दिरंगाई करणे सुरू असल्याने अवथळे कुटुंब प्रचंड मानसिक तणावाखाली जगत आहे. सवाल आता उपस्थित होत आहे. या अन्यायाविरोधात आणि स्थानिक पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेविरोधात तक्रारदाराने दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजीच पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांना लेखी निवेदन देऊन न्याय मागितला होता. मात्र, दोन महिने उलटूनही या निवेदनावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या मौनामुळे ग्रामीण पोलिसांचे फावले असून आरोपीचे मनोधैर्य वाढले आहे.

आरोपी मोकाट असल्याने अवथळे कुटुंबाच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन मुख्य आरोपी व त्याला सहकार्य करणाऱ्यांना अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, कर्तव्यात कसूर करून पदाचा गैरवापर करणाऱ्या पीआय प्रविण मानकर आणि पीएसआय विजयमाला रिठे यांची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ नोकरीतून बडतर्फ करावे आणि कुटुंबाला तातडीने पोलीस संरक्षण द्यावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.

​दरम्यान, या प्रकरणात तात्काळ न्याय न मिळाल्यास आणि आमच्या कुटुंबाच्या जीवितास अथवा मानसिक स्वास्थ्यास कोणतीही हानी पोहोचल्यास, त्यास संबंधित आरोपी आणि हे दोन्ही पोलीस अधिकारी सर्वस्वी जबाबदार राहतील, असा इशाराही तक्रारदाराने दिला आहे. आता यवतमाळचे पोलीस अधीक्षक या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन आपल्याच खात्यातील अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!