फेरचौकशीच्या नावाखाली वेळकाढूपणा? तक्रारदाराचा आक्षेप!

0

🔥फेरचौकशीच्या नावाखाली वेळकाढूपणा? तक्रारदाराचा आक्षेप!

🔥ज्यांच्याविरुद्ध तक्रार त्यांच्यासमोरच बयान देण्यास नकार; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे बयान नोंदविण्याची सचिन वाघे यांची भूमिका

वर्धा -/ दहेगाव गोसावी पोलीस ठाण्यात २९ मे २०२६ रोजी घडलेल्या प्रकरणाची फेरचौकशी करण्याच्या मागणीला आता वेगळे वळण मिळाले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा सुनील महाडिक यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालावर आक्षेप घेत सचिन वाघे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे फेरचौकशीची मागणी केली होती.

या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सचिन वाघे यांचे बयान नोंदविण्यासाठी दहेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत कदम आणि पोलीस कर्मचारी आनंद भस्मे यांच्याकडे पाठविल्याचे सांगण्यात येते. मात्र, ज्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे, त्यांच्याच उपस्थितीत बयान देण्यास सचिन वाघे यांनी नकार दिला. आपण आपले बयान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोरच नोंदविणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली.

या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज, तक्रारदाराचे बयान, त्याच्यासोबत आलेल्या व्यक्तीचे बयान तसेच इतर संबंधित पुरावे उपलब्ध असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. असे असतानाही या पुराव्यांची स्वतंत्र पडताळणी करून फेरचौकशी करण्याऐवजी पुन्हा त्याच पोलीस ठाण्यात बयान नोंदविण्याची प्रक्रिया का राबविली जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

ज्यांच्याविरुद्ध तक्रार आहे, त्यांच्याच पोलीस ठाण्यात बयान नोंदविण्याची प्रक्रिया सोपविणे कितपत योग्य आहे? फेरचौकशीची मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केल्यानंतरही स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत चौकशी का केली जात नाही? असे प्रश्न सचिन वाघे यांनी उपस्थित केले आहेत.

फेरचौकशीच्या नावाखाली केवळ वेळकाढूपणा सुरू आहे का? तक्रारीतील पुरावे तपासून निष्पक्ष चौकशी होणार की प्रकरण पुन्हा त्याच प्रक्रियेत अडकणार? आता वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!