पोटच्या लेकरांना विष पाजून पित्यानेही संपविले जीवन ; साखरा गावात सापडला मृतदेह

0

साहसिक न्यूज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
जन्मदात्या बापाने पोटच्या दोन चिमुकल्यांना आधी विष पाजून नंतर गळा आवळून हत्या केली. त्यानंतर स्वगावी येत स्वत: विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शनिवार 3 रोजी उघडकीस आली. संजय श्रीराम कांबळे वय (40) असे पित्याचे, तर सुमित (7), मिस्टी (3) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत. समुद्रपूर तालुक्यातील साखरा येथील रहिवाशी संजय कांबळे आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वरोरा तालुक्यातील बोर्डा येथे वास्तव्यास होता. खाजगी शिकवणी हा त्यांचा व्यवसाय होता. यातून मिळणार्‍या उत्पन्नातून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नी पनिता (35) ही एका महाविद्यालयात कंत्राटी स्वरुपात नोकरीवर जात होती. त्यांच्या संसारवेलीवर सुमित आणि मिस्टी अशी दोन फुले उमलली होती. काही दिवसांपासून संजय कांबळे यांची मानसिक स्थिती बिघडली होती. यामुळे शिकवणीवर्ग बंद होण्याच्या मार्गावर होते. शुक्रवार 2 रोजी सकाळी पत्नी पनिता ही कॉलेजमध्ये कामानिमित्त गेली होती. सुमित आणि मिस्टी ही दोन मुले वडिल संजय कांबळे यांच्यासोबत घरी होती. मात्र, सायंकाळी पनिता घरी आल्या असता घराचा मुख्य दरवाजा लावलेल्या स्थितीत होता. परंतु, पतीची चप्पल तिथे नव्हती. त्यामुळे ते बाहेर गेले असावे, असे तिला वाटले. त्यानंतर घराचा दरवाजा उघडून बघितले असता तिला मोठा धक्का बसला. दोन्ही मुले बेडवर पडलेली होती. तोंडातून फेस बाहेर आलेला होता. तिच्या ओरडण्याने शेजारच्या नागरिकांनी धाव घेतली. तातडीने दोन्ही मुलांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी दोन्ही मुलांना मृत घोषित केले.
वरोरा पोलिसांनी संजय कांबळे यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. वरोरा पोलिस फरार संजयच्या शोधात असताना साखरा गावाजवळील मंगरूळ फाट्यालगत शेतकरी धवणे यांच्या शेतात संजयचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच गिरडचे ठाणेदार सुनील दहिभाते यांनी घटनास्थळी दाखल होत तपास केला. संजय कांबळे याने विष प्राशन करून जीवन संपविल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे गिरड पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, या हृदयद्रावक घटनेमुळे संजय कांबळे यांची पत्नी पनिता हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळाला आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!