‘ब्रँड’वर विश्वास ठेवला… पण शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांनी दगा दिला .!

0

🔥’ब्रँड’वर विश्वास ठेवला… पण शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांनी दगा दिला .!

🔥हेच ते नामांकित कंपन्यांचे सोयाबीन उगवलेच नाही; शेतकरी हवालदिल.

🔥बुस्टर, रवी सीड्स, किशोर सीड्स, इनोवेज आदी कंपन्यांविरोधात तक्रारी; ‘नुकसानाला जबाबदार कोण?’ असा संतप्त सवाल

सचिन धानकुटे सेलू -/ “नामांकित कंपनीचे बियाणे आहे, उगवण चांगली होईल,” या विश्वासाने हजारो रुपयांचा खर्च करून सोयाबीनची पेरणी केलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचा आरोप होत आहे. बुस्टर, रवी सीड्स, किशोर सीड्स, इनोवेज आदी कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्यांची उगवण अत्यल्प झाली किंवा अनेक ठिकाणी उगवणच झाली नसल्याच्या तक्रारी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत.

तालुक्यातील रेहकी कला, सुरगाव, घोराड आणि महाबळा येथील शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय गाठून आपली कैफियत मांडली आहे. पावसाळ्याचा हंगाम सुरू असताना बियाणे न उगवल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले असून आता दुबार पेरणीसाठी अतिरिक्त खर्चाचा डोंगर उभा राहिला आहे.

रेहकी येथील अरविंद शिंदे यांनी ११ एकर क्षेत्रात बुस्टर कंपनीच्या सोयाबीन बियाण्याची पेरणी केली होती. मात्र, त्यापैकी अवघी १० ते ११ टक्केच उगवण झाल्याचा त्यांचा दावा आहे. घोराड येथील विनायक धोंगडे यांच्या सहा एकर शेतात बुस्टर कंपनीचे ‘हुतुतू’ वाण उगवलेच नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. रेहकी येथील अमोल धानकुटे यांच्या शेतात अंकुर कंपनीचे, महाबळा येथील सागर तेलरांधे यांच्या शेतात बुस्टर कंपनीचे, तर सुरगाव येथील प्रवीण गायकवाड आणि विलास गायकवाड यांच्या शेतात रवी सीड्स कंपनीचे सोयाबीन बियाणे उगवले नसल्याचे शेतकऱ्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सेवा केंद्रांशी संपर्क साधून तक्रारी केल्या. मात्र, दुकानदारांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. संबंधित कंपन्यांचे प्रतिनिधीही समाधानकारक उत्तर देऊ शकले नसल्याने शेतकऱ्यांचा संताप आणखी वाढला आहे.

अखेर पीडित शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय गाठून तालुका गुण नियंत्रण अधिकारी ज्योत्स्ना घरत यांच्याकडे आपली व्यथा मांडली. त्यांनी काही कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला असता काहींनी प्रतिसाद दिला, तर काहींनी टोलवाटोलवीची भूमिका घेतल्याचे समोर आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या लाखो रुपयांच्या नुकसानीस नेमके जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.

खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच उद्भवलेल्या या गंभीर प्रकाराची कृषी विभागाने तातडीने शेतपातळीवर पाहणी करून पंचनामे करावेत, दोषी आढळणाऱ्या कंपन्या आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी पीडित शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!