“राष्ट्रीय सिनेमा दिन विशेष” “चित्रपट भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक”
“हम जहां खड़े होते हैं लाइन वहां से शुरू होती है।” , “कहते हैं अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात
उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है।” , ” बाबू मोशाय…जिंदगी बड़ी होनी चाहिए लंबी नहीं “, ” पुष्पा, पुष्पराज…मैं झुकेगा नहीं साला ”
गावाखेड्यातल्या गल्ल्यांपासून ते राजधानी दिल्ली पर्यंत, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत असे कुणीच नसणार ज्याला या चित्रपटातील संवादांचे वेड लागले नाही. सण, उत्सव, लग्नसमारंभ, स्वातंत्र्यदिनासमवेत देशभक्तीचे सोहळे, पहिले पहिले प्रेम किंवा प्रेमभंगाचे ते असहनीय दु:ख… जणूकाही प्रत्येक दिवस साजरा करण्यासाठी, भावनांना व्यक्त करण्यासाठी या सिनेसृष्टीने आपल्याला १०१ दर्जेदार गाण्यांचा खजिनाच दिला आहे.
पोषाखातील नवनवीन फॅशन असूद्या किंवा केशभूषेतील विविधता, अगदी तळागाळातील माणसाच्या दैनंदिन जीवनशैलीत ज्यांनी आमूलाग्र बदल घडवून आणलेत ती म्हणजे आपली चित्रपट आहेत.
पौराणिक कथेंपासून सुरूवात होऊन आज दुर्लक्षित झालेली किंवा तथाकथित सभ्य समाजात शिष्टसंमत न समजली जाणारी, संवेदनशील विषय घेऊन आज शेकडो दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली जातेय.
आज जणू काही आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य घटक होऊन गेलेल्या या चित्रपटांची निर्मिती आपल्या भारत देशात कशी काय झाली? आज राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त आपण जाणून घेऊया आपल्या भारतीय सिनेसृष्टीचा महान इतिहास…
ही बाब आहे सन १८९५ ची, लुईस लुमिअर आणि अगस्त लुमिअर हे दोघे बंधू मूळचे फ्रान्स या देशातील होते.
या दोघांनी मिळून ‘द अराईवल ऑफ अ ट्रेन’
नावाचा एक चित्रपट बनविला. ऐकून कदाचित आश्चर्य होणार, वास्तविक या चित्रपटात ड्रामा, इमोशन्स, रोमान्स, अँक्शन असले, काहीच नव्हते तर निव्वळ एक प्लॅटफॉर्म वर येणारी ट्रेन या चित्रपटात दाखविली गेली होती! या चित्रपटाचा कालावधी १ मिनिटांहून देखील कमी होता!
हा चित्रपट २८ डिसेंबर १८९५ रोजी पॅरिस, फ्रान्समधील एका कॅफेमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. फ्रान्समधील भरघोस यशानंतर लुमिअर बंधूंनी हा चित्रपट लंडन येथे प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदाच एका मोठ्याशा पडद्यावर चित्रपट बघतांना लोकांचा असा गैरसमज होऊ लागला की ट्रेन पडद्यातून बाहेर येत आहे, आणि काहीच क्षणात या ट्रेनखाली येऊन आपला मृत्यू होणार की काय या भीतीपोटी लोक मुख्य दाराकडे पळू लागलीत. या घटनेमुळे अक्षरश: काही लोकांची प्रकृती बिघडली यामुळे चित्रपटगृहात परिचारिकांची नेमणूक देखील करावी लागली होती. तरी अशा काही अपवादात्मक प्रसंगांमुळे सुद्धा लुमिअर बंधूंच्या या चित्रपटाची लोकप्रियता काही कमी झाली नाही. वाढती लोकप्रियता आणि स्तुतीने प्रेरित होऊन लुमिअर बंधूंनी “सिनेमॅटोग्राफे” नावाची एक चित्रपट निर्माण करणारी कंपनी सुरू केली. नंतर त्यांनी निर्णय घेतला की ते आपली चित्रपट संपूर्ण जगभर दाखविणार. या कार्याचा श्रीगणेशा करण्याकरिता ते लंडनहून ऑस्ट्रेलियाला रवाना झालेत. पण वाटेत त्यांनी बॉम्बे (मुंबई) येथे मुक्काम ठोकला. तिथे त्यांनी असा विचार केला की त्यांची चित्रपट त्यांनी भारतात देखील प्रदर्शित करावी. ७ जुलै १८९६ रोजी बॉम्बे च्या “टाइम्स ऑफ इंडिया” मध्ये एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ज्यामध्ये लोकांना “शतकातील सर्वात मोठी उपलब्धी” आणि “जगातला सर्वात मोठा चमत्कार” बघायला येण्याचे आवाहन केल्या गेले होते! गर्दी टाळता यावी याकरिता चार वेगवेगळ्या वेळी देण्यात आल्या होत्या आणि टिकिटीची फी आकारण्यात आली होती . १ रूपया जी त्या काळात एक मोठी रक्कम होती! शेवटी १४ जुलै १८९६ रोजी बॉम्बे येथील नॉवेल्टी थिएटर येथे चित्रपट दाखविण्यात आला. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला. प्रेक्षकांचे प्रेम पाहून लुमिअर बंधूंनी हा चित्रपट सतत ३ दिवस थिएटर मध्ये दाखविण्याचा निर्णय घेतला. तसेच यासह आणखी काही चित्रपट दाखविली जावीत असा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला. अशाप्रकारे एकूण २४ चित्रपटं दाखविली गेलीत, लोकांनी ही चित्रपट बघण्यासाठी तुफान गर्दी केली. याकरिता चित्रपट दाखविण्याचा कालावधी ३ दिवसांहून १ महिन्याचा करण्यात आला.
ब्रिटिशांच्या गुलामगिरीविरुद्ध लढत असताना निव्वळ चळवळी, आंदोलने हा जणू काही जीवनाचा अविभाज्य घटक होऊन बसलेल्या भारतीयांच्या जीवनात चित्रपटाच्या माध्यमातून मनोरंजनाचे एक अनोखे माध्यम समोर आले.
एकीकडे सामान्यांच्या जीवनात या हालचाली घडत असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील धुंडीराज गोविंदराव फाडके नावाचा एक कलेने झपाटलेला कलावंत नुकताच आपल्या गोधरा येथील छायाचित्रकारिकेच्या व्यवसायाला रामराम ठोकून काहीतरी नवीन करण्याच्या शोधात होता. अश्यातच त्यांची भेट झाली ती लुमिअर बंधूंनी नेमलेल्या ४० जादूगरांपैकी एका जादूगराशी. तो होता जर्मन जादूगर कार्ल हर्ट्झ. आणि तेव्हापासून त्यांना स्थिरचित्रांमध्ये आवड निर्माण झाली.
काहीकाळ भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थेमध्ये त्यांनी ड्राफ्ट्समन म्हणून नोकरीही केली. त्यानंतर स्वतःचा छापखानाही काढला आणि याच व्यवसायात प्रगती व्हावी म्हणून नवनवीन तंत्र आणि यंत्रांचा अभ्यास करण्यासाठी ते जर्मनीला गेलेत. हा व्यवसाय सुरळीत चालू असताना त्यांचा त्यांच्या सहकाऱ्यांशी वाद झाला आणि हा छपाईचा व्यवसाय अखेर बंद करावा लागला.फाडकेंना नवनवीन गोष्टी पाहण्यामध्ये आणि त्या शिकण्यामध्ये जास्त आवड होती, एकदा त्यांनी “लाईफ ऑफ ख्रिस्त” हा मूकपट पाहिला आणि ते प्रचंड प्रेरित झाले होते.आपणही मूकपट बनवावा अशी तीव्र इच्छा त्यांच्या मनात जागृत झाली आणि त्यांनी १९१२ साली मित्राकडून कर्ज काढून थेट इंग्लंड गाठले. मूकपट बनविण्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीची माहिती घेतली. तिथूनच तंत्रज्ञानही शिकून आलेत आणि १९१२ सालीच त्यांनी “राजा हरिश्चंद्र” या पहिल्या मूकपटाची निर्मिती केली. जो मूकपट ३ मे १९१३ रोजी मुंबईच्या कॉरोनेशन चित्रपट गृहामध्ये दाखविण्यात आला. त्याकाळात समाजात रूढी खोल मुळे टाकून पसरलेल्या होत्या , अशा रूढीबध्द उपासनेच्या मगरमिठीत स्त्रिया अत्यंत हलाखीचे जीवन जगत होत्या, अश्या परिस्थितीत एखाद्या स्त्रीने चक्क चित्रपटात भूमिका साकारणे पांढरपेशा समाजाला मंजूर नव्हते. आणि म्हणूनच चित्रपटातल्या स्त्री कलाकाराची भूमिका साकारण्यासाठी त्यांनी प्रसंगी त्या भूमिका पुरूष कलाकाराकडून करवून घेतल्या. अथक अडचणींवर मात करीत असा हा मराठी आणि भारतीय चित्रपटसृष्टीतला पहिला चित्रपट ठरला. जो चित्रपटगृहात २३ दिवस चालला. या मूकपटामुळे पहिल्याच प्रयत्नामध्ये फाडकेंना देदीप्यमान यश प्राप्त झाले होते. त्यानंतर फाडक्यांनी ठरविले की आपण अजून चित्रपट बनवायचे. पण प्रत्येक चित्रपट सर्वसामान्यांपासून ते थोड्या मोठ्या वर्गापर्यंत प्रत्येकाला पटणारे असावेत, आवडणारे असावेत. आणि त्यातून निर्माण झालेत अनेक पौराणिक चित्रपट मोहिनी भस्मासुर, सावित्री सत्यवान, लंका दहन, श्रीकृष्ण जन्म, कालिया मर्दन, सेतू बंधन आणि गंगावतरण. मूकपटांच्या लांबलचक मालिकेनंतर शेवटी १४ मार्च १९३१ रोजी भारताचा पहिला बोलपट प्रदर्शित झाला त्याचे नाव होते “आलमआरा”.
जरी धुंडीराज गोविंदराव फाळके उर्फ दादासाहेब फाळके या मराठमोळ्या माणसाने भारतीय चित्रपटसृष्टीचा श्रीगणेशा केला असणार तरी पुढील काळात पृथ्वीराज कपूर या मूळच्या लाहोर ( फाळणीपूर्व पाकिस्तान) येथील कलावंताने भारतीय सिनेसृष्टीत गरुडझेप घेतली. राज कपूर पासून ते रणबीर कपूर पर्यंत जवळपास ४ पिढ्यांपासून सिनेसृष्टीची सेवा करणारे हे कपूर घराणे जणू भारतीय चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुराच आहे! पण म्हणून गॉडफादर नसलेल्या नवाजुद्दीन सिद्दिकी सारख्या हिऱ्यांची परख येथे केल्या जात नाही , असे मुळीच नाही!
कधी वादाच्या भोवऱ्यात सापडलीत, कधी सेन्सॉर बोर्डने नकारलीत, कधी बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटलीत, तर कधी वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या स्मृती पटलावर कोरल्या गेलेली ही चित्रपट निसंदेह मानवी प्रजातीच्या अस्तापर्यंत मानवी जीवनाचा अविभाज्य घटक म्हणून जिवित असणार!
निकिता अनु शालिकराम बोंदरे.
कोराडी,नागपूर
ईमेल – nikitabondre1234@gmail.com