विठ्ठल दर्शनासाठी वर्ध्यातून धावणार विशेष बसगाड्या ; १० बसेस बुक

0

🔥विठ्ठल दर्शनासाठी वर्ध्यातून धावणार विशेष बसगाड्या ; १० बसेस बुक

वर्धा -/ आषाढी एकादशी जवळ येताच पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची पावले वेगाने वळू लागली आहेत. या वाढत्या गर्दीचा अंदाज घेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वर्धा विभागाने विशेष बससेवेची तयारी जोरात सुरू केली आहे. वर्धा विभागातील पाच आगारांतून विशेष बसगाड्या सोडण्यात येणार असून, आतापर्यंत १० बसेसचे बुकिंगही पूर्ण झाले आहे. मागणी वाढताच आणखी बसेस उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती विभागाने दिली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीच्या निमित्ताने जिल्ह्यातील हजारो वारकरी आणि भाविक पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. काहीजण पायी दिंडीसोबत चालत आहेत, तर ज्येष्ठ नागरिक, महिला आणि कुटुंबांसह प्रवास करणारे भाविक सुरक्षित, सोयीस्कर आणि परवडणाऱ्या प्रवासासाठी एसटीला पसंती देत आहेत. त्यामुळे वर्धा, पुलगाव, हिंगणघाट, आर्वी आणि तळेगाव या पाच आगारांतून विशेष बसगाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

वर्धा विभागाकडून यंदा सुमारे १२० विशेष बसेस चालविण्याची तयारी ठेवण्यात आली असून, प्रवाशांचा प्रतिसाद पाहून ही संख्या आणखी वाढविण्यात येणार आहे. समूहाने प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी आगाऊ बुकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पंढरपूरवारी अधिक सुलभ आणि नियोजनबद्ध होणार आहे.

एसटी प्रशासनाने इच्छुक भाविकांना संबंधित आगार प्रमुख किंवा बसस्थानक प्रमुखांशी संपर्क साधून वेळेत बस आरक्षित करण्याचे आवाहन केले आहे. सुरक्षित, विश्वासार्ह आणि किफायतशीर प्रवासासाठी एसटी सेवेलाच प्राधान्य द्यावे, असेही प्रशासनाने सांगितले आहे.

“आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष बससेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. आतापर्यंत १० बसेसचे बुकिंग झाले असून, मागणीनुसार आणखी बसेस सोडण्यात येतील. भाविकांनी आगाऊ बुकिंग करून या सुविधेचा लाभ घ्यावा.”( भगवान जगनोर, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, वर्धा.)

          गणेश रेंगे साहसिक         News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!