🔥संस्थेचा पैसा लाटून संचालकांनी संपत्ती केली स्वतःच्या नावे रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेत कोट्यवधींचा महाघोटाळा!🔥हाच तो मास्टरमाइंड अतुल महाजनचा खोट्या आश्वासनांचा खेळ उघड🔥अध्यक्ष आशिष सोमणसह संचालक मंडळाची पळवाट
🔥इतर शाखांमधील ठेवी मोडून मुख्य शाखेकडे वळविल्या; कर्मचारी आणि एजंट दुहेरी संकटात
🔥सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
यवतमाळ (प्रतिनिधी) -/ सर्वसामान्यांचा घामाचा पैसा सुरक्षित ठेवण्याच्या नावाखाली चालणाऱ्या पतसंस्था गरिबांचे कष्टाचे भांडवल गिळंकृत करण्याचे अड्डे बनल्याचे भयानक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. ‘रावसाहेब पटवर्धन’ पतसंस्थेच्या संचालक मंडळाने ठेवीदारांच्या विश्वासाचा क्रूरपणे खून करत कोट्यवधी रुपयांचा निधी हडप केला आहे. संस्थेच्या पैशातून स्वतःच्या वैयक्तिक नावे मालमत्ता आणि आलिशान संपत्ती उभी करणाऱ्या या भ्रष्ट टोळीने शेकडो निष्पाप कुटुंबांना रस्त्यावर आणून ठेवले आहे. ठेवीदारांच्या पैशांची विल्हेवाट लावून हा महाघोटाळा पचवण्याचा डाव खेळणाऱ्या या संचालक मंडळाच्या मुजोरीमुळे संपूर्ण सहकार क्षेत्रात तीव्र संताप उसळला आहे.
जिल्ह्यातील पुसद अर्बन, निर्मल उज्ज्वल आणि माऊली अर्बन यांसारख्या पतसंस्था एकामागोमाग एक डबघाईस आल्यामुळे संपूर्ण सहकार विश्वात ठेवीदारांमध्ये अविश्वासाचे आणि घबराटीचे वातावरण पसरले होते. हीच भीती रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेच्या खातेदारांमध्ये निर्माण झाली. आपला कष्टाचा पैसा परत मिळवण्यासाठी ठेवीदारांनी मुख्य शाखेत पैसे काढण्यासाठी (विड्रॉल) मोठी गर्दी करण्यास सुरुवात केली. मात्र, लोकांचा वाढता ओघ आणि स्वतः केलेले कोट्यवधींचे गैरव्यवहार उघडकीस येण्याच्या भीतीने अध्यक्ष आशिष भालचंद्र सोमण याने जून महिन्यापासून मुख्यालयाकडे पाठ फिरवली. जूनपर्यंत रोज हजेरी लावून सर्व कारभार स्वतःच्या मर्जीने चालवणारा हा अध्यक्ष परिस्थिती हाताबाहेर जाताच कार्यालयातून गायब झाला. ‘वाटलेल्या कर्जाची वसुली करा किंवा ठेवी परत करा’ असे दिखाऊ फर्मान काढून अध्यक्षाने स्वतःचा बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
अध्यक्ष सोमण पळून गेल्यानंतर उपाध्यक्ष वैशाली राजेश पाटणे यांनी मुख्यालयाची सूत्रे हाती घेतली. मात्र, स्थिती सुधारण्याऐवजी त्यांनी उर्वरित शाखांवर दरोडा टाकण्याचे धोरण अवलंबले. मुख्य शाखेतील रोख रकमेची तीव्र टंचाई लपवण्यासाठी आणि विड्रॉलचा ओघ तात्पुरता दाबण्यासाठी घाटंजी, वणी, वर्धा आणि हिंगणघाट या शाखांकडे मोर्चा वळवण्यात आला. तेथील शाखांमधील फिक्स डिपॉझिट्स आणि इन्व्हेस्टमेंट मोडून कर्मचाऱ्यांवर प्रचंड दबाव आणून सर्व निधी मुख्य शाखेकडे खेचून घेण्यात आला. परिणामी, सुरळीत चालू असणाऱ्या या इतर शाखांचे अक्षरशः कंबरडे मोडले. जेव्हा या शाखांच्या व्यवस्थापकांनी दैनंदिन व्यवहारासाठी निधीची मागणी केली, तेव्हा संचालक मंडळाने त्यांना ठेंगा दाखवत ‘पुन्हा बाजारातून ठेवी गोळा करा आणि तुमचे व्यवहार तुम्हीच सांभाळा’ असा तुघलकी आदेश दिला. आधीच लोकांचे पैसे परत मिळत नसताना बाजारातून नवीन ठेवी आणायच्या कुठून, या विवंचनेत स्थानिक कर्मचारी आणि एजंट पुरते होरपळून निघाले.
या संपूर्ण आर्थिक गैरव्यवहाराचा खरा मुख्य सूत्रधार (मास्टरमाइंड) अतुल रामदास महाजन हा पडद्यामागून उपाध्यक्ष वैशाली पाटणे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून खेळ खेळत होता. पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी जेव्हा कर्मचारी आणि एजंट मुख्यालयात येत, तेव्हा पाटणे आणि महाजन यांची जोडी त्यांना खोटी आश्वासने देऊन वेळ मारून नेत होती. वास्तविक पाहता, संस्थेचे हस्तांतरण करणे किंवा स्वतःच्या नावे केलेल्या बेनामी मालमत्ता गहाण ठेवून निधी उभा करणे असे अनेक वैध पर्याय उपलब्ध होते. मात्र, पाप झाकण्याच्या नादात संपूर्ण संचालक मंडळ सुस्त बसून राहिले.
महाजन याने विविध शाखांचे दौरे काढून एजंट्सची सातत्याने दिशाभूल केली. शेवटी पैशाचे सोंग आणता येत नाही आणि केलेले काळे कारनामे फार काळ लपवता येत नाहीत, या नियमानुसार या महाभागांचा खोटेपणा चव्हाट्यावर आला. कोणतीही कायदेशीर जबाबदारी स्वीकारण्याऐवजी संपूर्ण संचालक मंडळाने तडकाफडकी राजीनामे फेकून पळ काढला. गोरगरीब, शेतकरी आणि पेन्शनधारकांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या या निर्लज्ज आणि बेशरम संचालक मंडळाविरोधात आता जनक्षोभ उसळला आहे. उद्या सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून या घोटाळेबाज, भ्रष्ट संचालकांवर कोणती दंडात्मक आणि फौजदारी कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. ठेवीदारांचा एक-एक रुपया वसूल करून या महाठगांना तुरुंगाची हवा दाखवल्याशिवाय हा लढा शांत होणार नाही, असा इशारा पीडित ठेवीदार आणि कर्मचाऱ्यांनी दिला आहे.(क्रमशः)