“स्वप्नभरारी घेणारा शास्त्रज्ञ” – स्टिफन हॉकिंग
दरवर्षी १० सप्टेंबर ला जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवशी भारतासमवेत जगभरातील आत्महत्यांची आकडेवारी प्रसिद्ध केल्या जाते.नैराश्येच्या लाटेवर स्वार होऊन देशात किंवा जगभरात एका वर्षात किंवा अमूक तासाला,अमूक मिनिटाला इतकी इतकी माणसे स्वतःचे आयुष्य संपवितात.मग आकडेवारी पाहून चक्रावलेल्या काही संघटना (तर काही व्यक्तीगत स्वयंघोषित तत्त्वज्ञानी सुद्धा!) जनजागृतीचे उपक्रम राबवितात.चांगल्या कामासाठी आपापल्या परीने खारीचा वाटा उचलण्यात वाईट असे काहीच नाही! पण एक मात्र खरचं विचार करण्यासारखी बाब आहे की ही सगळी भागीरथ प्रयत्न कितपत सार्थक ठरतात? आत्महत्यांची आकडेवारी कमी होते काय ? स्थिरावते काय ? किंवा संपूर्ण नाहिशी होते काय? सद्यस्थितीत ८०० करोड लोकांच कुटुंब असलेली आपली पृथ्वी… तरी देखील माणसाला एकाकीपण जडतय, आयुष्याचा सार सांगणाऱ्या भगवदगीता,कुराण,बायबल सारखे विविध पवित्र धर्मग्रंथ उपलब्ध असून सुद्धा का बर माणूस इतका हतबल होऊन बसतो? मृत्यूच्या भीतीपोटी स्वर्ग-नर्क आणि मृत्यू पश्चात असणाऱ्या जीवनाच्या (?) परिकल्पना देखील अतिमहत्त्वकांक्षी झालेल्या मानवी मनाला दिलासा देण्याकरीता पुरेश्या ठरत नाहीत.अगदी उर्दू भाषेतील प्रसिद्ध शायर मिर्झा गालिब यांच्या एका शायरीप्रमाणे ‘ हमको मालूम हैं जन्नत की हकीकत लेकिन दिल के खुश रखने को ‘गालिब’ ये खयाल अच्छा हैं! ‘
एकीकडे मानवी मनाची अशी विखुरलेली परिस्थिती असतांना
आपण त्या माणसाला काय म्हणावे ज्याला वयाच्या अगदी २१ व्या वयात मोटार न्यूरॉन रोगातील एएलएस (ॲम्योट्रफिक लॅटरल स्क्लेअरोसिस) हा भयंकर आजार झाल्याचे समजले. डॉक्टरांनी त्यांना ते फक्त दोन वर्षे जिवंत राहतील अशी शक्यता वर्तविली,परंतु केवळ जिद्द, होकारात्मकता, जीवनाप्रती प्रचंड प्रेम आणि कार्यमग्नता यामुळे त्यांनी डॉक्टरांचे म्हणणे खोटे ठरविले.त्यांनी त्यानंतर अर्धशतक ठोकले.चिकित्सा विज्ञानाला त्यांनी जणू एक आव्हानच दिले.
ती व्यक्ती दुसरी कोणी नसून २१व्या शतकातील सर्वात बुद्धिमान आणि महान शास्त्रज्ञ, एक जगद्विख्यात भौतिकशास्त्रज्ञ, ब्रम्हांड वैज्ञानिक आणि लेखक असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजेच स्टिफन विलियम हॉकिंग.
आज १४ मार्च म्हणजेच महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांचा जन्मदिन जो संपूर्ण जगभरात ‘World Genius Day’ म्हणून साजरा केल्या जातो आणि शोकांतिका अशी की या ‘World Genius Day’ च्या दिवशीच ४ वर्षापूर्वी २०१८ ला जगातील सर्वात महान Genius! स्टिफन विलियम हॉकिंग यांनी या जगाचा निरोप घेतला होता.
स्टिफन विलियम हॉकिंग हे एक असे रसायन होते जे चांगल्या चांगल्यांच्या आवाक्याच्या पलीकडचे होते! या माणसाबद्दल जितके बोलावे, लिहावे तितके कमीच! कवींची सर्व शब्दसुमने या व्यक्तीला गौरवांकित करण्याकरीता पुरेशी नाहीच!
शालेय जीवनात फारसे हुशार म्हणून न ओळखल्या जाणाऱ्या स्टिफन हॉकिंग यांनी महाविद्यालयीन जीवनात मात्र आपल्या अचाट बुध्दिमत्तेने सर्वांना दिपवून टाकले. मोटार न्यूरॉन या भयंकर आजारामुळे जवळपास संपूर्ण शरीर निकामी पडलेल्या हॉकिंग यांचे केवळ गालाच्या मांसपेशी शाबूत होत्या. हा असाध्य व दुर्मिळ आजार होऊनही केवळ आत्मविश्वास आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी ब्रम्हांड, ब्रम्हांडाचे रहस्य, अवकाश संशोधन तसेच कृष्णविवरांसंदर्भात केलेले संशोधन, तसेच एलियन्स, टाईम ट्रॅव्हल, पर्यावरणीय आव्हान,भविष्यातील मानवी प्रजातीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासंदर्भातील आव्हान,पृथ्वीचे अस्तित्व तसेच ईश्वराचे अस्तित्व मान्य नसलेले त्यांचे स्पष्ट परखड मत… एकूणच त्यांच्या या क्रांतिकारी संशोधनांनी आणि आमूलाग्र विचारांनी त्यांनी जगभरातील लोकांना विचार करायला भाग पाडले.
शरीराला संपूर्ण अपंगत्व आलेल्या अवस्थेत त्यांनी विज्ञान जगातील सर्वात प्रभावशाली मानल्या जाणाऱ्या ग्रंथापैकी एक, १९८८ ला प्रकाशित झालेला ‘द ब्रिफ हिस्ट्री ऑफ टाईम’ हा ग्रंथ लिहिला. ब्रम्हांड आणि ब्रम्हांडाच्या रहस्यावर आधारित या ग्रंथाने संपूर्ण विज्ञानजगात एकच खळबळ माजवली.
१५० आठवड्यांकरीता ‘द न्यूयॉर्क टाईम्स बेस्ट सेलर’ आणि २३७ आठवड्यांकरीता ‘ब्रिटिश संडे टाईम्स बेस्ट सेलर’ असलेला हा ग्रंथ आपल्या वेळेतील ‘सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या’ ग्रंथांपैकी एक होता. अगदी सर्वसामान्य माणसाला सुद्धा कळेल असे ब्रम्हांडातील अवघड सिद्धांत त्यांनी सहजसोप्या पद्धतीने या ग्रंथात मांडले.
आपण सगळे वाटेल त्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याकरीता स्वतंत्र आहोत आणि माझे स्पष्ट मत हेच आहे की या विश्वात कोणीच ईश्वर नाहीये. या विश्वाला कोणत्याच ईश्वराने बनविलेले नाही आणि कोणीच आपले भाग्य देखील लिहीत नाही आणि हिच बाब मला या दृढ विश्वासाकडे घेऊन जाते की कुठलाच स्वर्ग अस्तित्वात नाहीये आणि मृत्यूनंतर कुठलेच जीवन किंवा पुर्नजन्म वगैरे अस्तित्वात नसते.आपल्या सर्वांकडे केवळ हेच एक जीवन उपलब्ध आहे या अनंत विश्वाचे ‘ग्रॅंड डिजाईन’ समजून घेण्याकरीता आणि ही आयुष्य जगण्याची मोलाची संधी मला मिळाली याकरीता मी खूप-खूप आभारी आहे.
जेव्हाकी ईश्वराच्या अस्तित्वाबाबत असे परखड मत मांडल्या बाबत त्यांना अत्यंत विखारी टिकांचा सामना देखील करावा लागला. पण लोकांच्या टिकेला घाबरून ते स्वतःच्या विधानांपासून कधीच मागे फिरले नाहीत.
ते म्हणतात, ‘ब्रम्हांडाला समजून घेण्यात मी माझी भूमिका पार पाडली, याचा मला सर्वाधिक आनंद होतो. ब्रम्हांडाची रहस्ये लोकांना खुली करण्यासाठी जे काही संशोधन झाले, त्यामध्ये मी माझे योगदान देऊ शकलो. जेव्हा माझे कार्य समजून घेण्यासाठी लोक माझ्याभोवती गर्दी करतात तेव्हा मला त्याचा अत्यंत अभिमान वाटतो.’
भारताचे तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन हे स्टिफन हॉकिंग यांना भारत दौऱ्यावर आले असताना भेटले होते. ते म्हणाले होते, ‘त्यांच्याशी झालेली भेट अविस्मरणीय होती. ‘ याच भेटीनंतर स्टिफन हॉकिंग यांच्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले होते, ‘स्टिफन हॉकिंग हे मानवासाठी आशेचा किरण आहेत आणि अशा सर्वांसाठी, जे एका अर्थी अपंग आहेत त्यांच्यासाठी ते प्रेरणास्थान आहेत. ‘
स्टिफन हॉकिंग यांचा हा प्रेरणादायी प्रवास प्रशांत पितालिया या लेखकाने त्यांच्या ‘स्वप्नभरारी घेणारा शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग’ या पुस्तकात अतिशय उत्कृष्ट रित्या मांडलेला आहे. त्यांच्या या पुस्तकाचा जणू पुनरावलोकन म्हणूनच मी आजच्या या माझ्या लेखाला त्यांच्या पुस्तकाचे शीर्षक दिले आहे.
स्वतः च्या अपंगत्वाकरीता कुठल्याच ईश्वराला किंवा नशीबाला व्यर्थ दोष देण्यात वेळ वाया न घालविता किंवा कुठल्याच सहानुभूतीची किंवा बाह्य प्रेरणेची अपेक्षा व्यक्त न करीता केवळ स्वतः वर विश्वास ठेऊन मिळालेल्या आयुष्याला धन्यवाद करीत स्टिफन हॉकिंग यांनी स्वबळावर स्वत:चा इतिहास रचला. वाट्याला आलेल्या कष्टांनी तळपून संपूर्ण मानवजातीला आशेचा प्रकाश दाखविणारा क्षितिजावरील सर्वात तेजस्वी सूर्य ठरलेल्या या शास्त्रज्ञाला त्याच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करीत मी मनोमन नमस्कार करते!
निकिता शालिकराम बोंदरे
कोराडी,नागपूर
ईमेल – nikitabondre1234@gmail.com