अ. भा. मराठी साहित्य संमेलनाची पूर्वतयारी गांधी विनोबा विचारधारा केंद्रस्थानी असावी – वर्धेकरांची मागणी
साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/वर्धा:
आगामी ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या फेब्रुवारी महिन्यात वर्धानगरीत होणार असून स्थानिक नियोजनाबाबत आयोजित सभेला जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य संस्थांच्या प्रतिनिधींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संमेलन गांधीविनोबांच्या विचारांनी प्रेरित असावे व तरुणाईचा सहभाग अधिकाधिक असावा, अशी भूमिका वर्धेकरांनी प्रामुख्याने मांडली.
स्थानिक बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित या सभेत विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डाॅ. रवींद्र शोभणे, अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य विलास मानेकर, प्रदीप दाते, शाखाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर यांनी संमेलनाची पूर्वतयारी आणि आगामी आयोजनाबाबत माहिती दिली. यावेळी अखिल भारतीय साहित्य संमेलनाची व्यापकता, पूर्वपीठिका, आयोजनाबाबतची सद्यस्थिती, वर्धानगरीचे स्थळमहात्म्य, स्थानिक संस्थांची भूमिका, अपेक्षा आणि सूचना, स्वागत समिती तसेच स्थानिक पातळीवरील विविध समित्या व उपसमित्यांचे स्वरूप, प्रत्यक्ष सहभाग आदी विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. या सभेत राममोहन बैंदूर, डाॅ. गजानन कोटेवार, मुरलीधर बेलखोडे, हरीश इथापे, प्रभाकर पुसदकर, महेश मोकलकर, डाॅ. अभ्युदय मेघे, डाॅ. सिद्धार्थ बुटले, डाॅ. राजेंद्र मुंढे, अजय मोरे, नंदकुमार वानखेडे, अॅड. अनंत साळवे, सुनील पाटणकर, डाॅ. सोहम पंड्या, राहुल तेलरांधे, राजेंद्र कोंडावार, अनघा आगवन, वंदना कोल्हे, प्रकाश अलवाडकर, बलराज लोहवे, विश्वनाथ बोंदाडे, प्रा. पद्माकर बाविस्कर, प्रमोद खोडे, सूरज बोदिले यांच्यासह विविध संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी सूचनावजा प्रस्ताव मांडले. डाॅ. शोभणे यांनी सभेत व्यक्त झालेल्या शंकांचे निरसन केले.
सभेला विदर्भ साहित्य संघाचे केंद्रीय कोषाध्यक्ष विकास लिमये, वर्धा शाखेचे पदाधिकारी डॉ. विलास देशमुख, रंजना दाते, डाॅ. स्मिता वानखडे, डॉ. पुरुषोत्तम माळोदे, प्रा. मीनल रोहणकर, ज्योती भगत, डॉ. राजेश देशपांडे यांच्यासह जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वर्धेकरांसाठी आनंदाची पर्वणी
वर्धानगरीत यापूर्वी १९६९ साली ज्येष्ठ साहित्यिक पु. शि. रेगे यांच्या अध्यक्षतेखाली ४८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. तब्बल ५३ वर्षांनंतर आयोजनाची संधी प्राप्त झाल्याने या सभेत वर्धेकरांचा उत्साह ओसंडून वाहत होता.