आझादी से अंत्योदय तक मोहिमेतील उत्कृष्ट कामासाठी वर्धा जिल्ह्याचा केंद्र शासनाच्यावतीने गौरव

0

साहसिक न्युज24
प्रतिनिधी/ वर्धा:
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्यावतीने देशातील 75 जिल्ह्यांमध्ये आझादी से अंत्योदय तक ही विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केल्याने दिल्ली येथे आयोजित विशेष समारंभात जिल्ह्याचा गौरव करण्यात आला आहे. तत्कालिन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार व मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.सचिन ओम्बासे यांनी आज हा पुरस्कार स्विकारला.
राजधानी दिल्लीत पार पडलेल्या या समारंभात केंद्रीय ग्रामविकास सचिन नागेंद्र नाथ यांनी या पुरस्काराचे वितरण केले. यावेळी केंद्र शासनाचे उपसचिव आशिष कुमार गोयल, संयुक्त सचिव जिम्पा भुटिया यांच्यासह केंद्र शासनाच्या नऊ विभागाचे अधिकारी व देशभरातील पुरस्कारास पात्र ठरलेल्या पहिल्या दहा जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, वर्धा जिल्हा परिषदेचे एमव्हीएसटीएफचे जिल्हा कार्यकारी अधिकारी प्रविण कुऱ्हे उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि.28 एप्रिल ते स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट पर्यंत 90 दिवस आझादी से अंत्योदय तक ही मोहिम राबविण्यात आली होती. केंद्र शासनाने यासाठी निवडलेल्या 75 जिल्ह्यांमध्ये राज्यातील तीन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यात वर्धासह नाशिक व रायगड या जिल्ह्याचा समावेश होता. मोहिम कालावधीत केंद्र शासनाच्या नऊ विभागाच्या 17 योजनांची उत्कृष्ट अंमलबजावणी करून लाभार्थ्यांना या योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळवून द्यावयाचा होता. यासाठी जिल्ह्यात विशेष मोहिम राबविण्यात आली होती. ठिकठिकाणी विशेष शिबिरांचे देखील आयोजन करण्यात आले होते.
जिल्ह्याने या कालावधीत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल बांधकाम, उमेदअंतर्गत गटांचे एकत्रिकरण, मनरेगा अभिसरण अंतर्गत क्लस्टरमध्ये शेवगा नर्सरी, दिव्यांगांची नोंदणी व त्यांना वैश्विक प्रमाणपत्राचे वाटप, कुपोषित बालकांचा शोध घेऊन त्यांना पौष्टीक आहार व औषधोपचार, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत लाभार्थ्यांचे बॅंक खाते उघडणे, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, कौशल्य विकास स्किल हब, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, गायी म्हशींचे लसिकरण, पीएम किसान नोंदणी, कोरोना लसिकरण, असंघटीत कामगारांची नोंदणी या योजनांच्याबाबतीत उत्कृष्ट काम केले. केंद्र शासनाने निश्चित केलेल्या 17 पैकी 12 योजनांमध्ये जिल्ह्याने शंभर टक्के काम मोहिम कालावधीत पुर्ण केले. त्याची दखल घेत केंद्र शासनाच्यावतीने जिल्ह्याचा गौरव करण्यात आला आहे.

अनेकांच्या सामुहिक प्रयत्नातून मिळाले यश

आझादी से अंत्योदय तक ही मोहिम तत्कालिन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार व मुकाअ डॅा.सचिन ओम्बासे यांच्या नेतृत्वात राबविण्यात आली. मोहिमेसाठी निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.ज्ञानदा फणसे यांनी नोडल अधिकारी म्हणून उत्तमपणे काम केले. सोबतच प्रकल्प संचालक विश्वास सिद, जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.रामेश्वर पराडकर, महिला व बालविकासचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेसरे, अग्रणी बॅंक प्रबंधक वैभव लहाने, कौशल्य विकासच्या सहाय्यक आयुक्त निता अवघड, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॅा.विद्या मानकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॅा.प्रज्ञा डायगव्हाणे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्राजक्ता इंगळे, कामगार अधिकारी के.जी.भगत, सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी रुचा कंधारे, एमव्हीएसटीएफचे जिल्हा कार्यकारी अधिकारी प्रविण कुऱ्हे यांच्या विभाग प्रमुख अधिकारी व त्यांच्या अधिनस्त सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोहिम कालावधीत उत्कृष्ट काम केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!