“आता या गुलामगिरीचा नायनाट झालाच पाहिजे!”

0

तशी ही फार जुनी गोष्ट आहे… पण काही गोष्टी कितीही जुन्या असल्या तरी मानवी स्मृतीमध्ये ‘परमानंट’ होऊन बसतात ही त्यापैकी एक आठवण… एकदा मी कॉलेज नंतर काही कामानिमित्त माझ्या वहिनीकडे गेले आम्ही स्त्रिया स्वयंपाक खोलीत डायनिंग वर बसून आमच्या चर्चा करत होतो तर समोर हॉल मध्ये पुरूषमंडळी चहापाण्या बरोबर टि. व्ही. वर बातम्या बघत होते. तितक्यातच ‘एका नराधमाने ५ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची’ एक बातमी आली.
‘बघा हो वहिनी, काय जमाना आलाय? भामटी या चिमुकल्या कळ्यांना सुद्धा सोडत नाही.त्या कोवळ्या जिवाशी असले घाण कृत्य करून कोणते लैंगिक आनंद प्राप्त होत असणार या नराधमांना? टि. व्ही. वर बातमी बघताबरोबरच माझ्या तळपायातली आग मस्तकात गेली आणि मी लगेच प्रतिक्रिया दिली.यावर वहिनीने निराशाजनक हुंकार दिला व काही वेळाने त्या उत्तरल्या तुला एक सांगू काय स्विटी… तू सध्या लहान आहेस म्हणून तुला कदाचित कळत नसणार पण एक सांगते… स्त्रीचे योनीमार्ग जितके छोटे असेल ना तितका कामक्रीडा करतांना पुरूषाला अधिक आनंद प्राप्त होतो! ”
आणि त्या समोर बोलत होत्या…
पण वहिनी च्या त्या उत्तराने मला मात्र माझ्या कितीतरी निरूत्तर प्रश्नांची उत्तरे मिळाली.
स्त्रीचा योनीमार्ग आणि त्याद्वारे पुरूषाला प्राप्त होणारा सर्वोत्तम आनंद, मग या आनंदावर आणि एकूणच आनंद देणारीवर, तिच्या कौमार्यावर, गर्भावर,तिच्या मनावर, इच्छा-आकांक्षांवर फक्त आणि फक्त माझाच अधिकार असावा हा स्वार्थी, वासनाधारी पुरूषाचा वेडा हट्ट… हेच स्त्रीच्या एकूण गुलामगिरीचे मूळ कारण आहे!
एकदा मी एक लेख वाचला होता,त्यात लेखकाने त्यांच्या लेखाची सुरूवात अतिशय भारदस्त ओळींनी केली होती… की ‘पुरूषाला त्याची इज्जत इतकीच प्रिय होती तर त्याने ती बाईच्या योनीतच का बर ठेवली?’
आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी इतिहासाचा अभ्यास केल्याबगैर पर्याय नाहीये.
आपण इतिहासात डोकावले तर आपणास कळणार… की ऋग्वैदिक कालखंड किती कल्याणकारी आणि व्यक्तीस्वातंत्र्याला प्राधान्य देणारा होता. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार होता… गार्गी,मैत्रेयी,लोपामुद्रा या वेदांमध्ये लिखाण करणाऱ्या विद्वान स्त्रिया त्याचे उदाहरण आहेत.सोबतच स्त्रियांना स्वतःचा जीवनसाथी स्वतः निवडण्याचा हक्क होता उदाहरण स्वयंवर,अविवाहित राहण्याचा हक्क होता,ज्या स्त्रिया अविवाहित राहायच्या त्यांना ‘अमाजू’ असे म्हटले जायचे आणि इतकेच काय तर ‘नियोग प्रथा’ सुद्धा अस्तित्वात होती अर्थातच ‘स्त्री तिच्या स्वेच्छेने तिला वाटेल त्या पुरुषाकडून अपत्य प्राप्त करू शकत होती.
इतिहासात हे सगळे वाचून मी इतकी आश्चर्यचकीत झाले की उत्तरवैदीक काळात मात्र या सगळ्या प्रथा कोठे लुप्त पावल्यात? आणि स्त्रियांची परिस्थिती इतकी दयनीय का झाली? की आजच्या २१ व्या शतकात देखील तिला दुय्यम दर्जाच दिला जातो!
याचे उत्तर अगदी सरळसोपे आहे… कालांतराने स्वार्थी पुरूषाला ही जाणीव झाली की जर का आपण स्त्रियांना शिक्षणाचा हक्क दिला, अमाजू राहण्याचा हक्क दिला, नियोग प्रथांसारख्या प्रथा कायम ठेवल्यात तर विद्यार्जनाने शहाणी झालेली स्त्री आत्मनिर्भर होणार,स्वतःचे निर्णय स्वतः घेणार मग आपण तिच्यावर नियंत्रण लादण्यावर असमर्थ होणार. तिच्यापासून मिळणाऱ्या सर्वोच्च लैंगिक सुखाला मुकणार! म्हणूनच पुरूषाने जाणीवपूर्वक उत्तरवैदीक काळापासून स्त्रीला तिच्या विविध अधिकारांसमवेत प्राथमिक मानवी अधिकारांपासून सुद्धा वंचित ठेवले. व तिच्या कौमार्य, लैंगिक इच्छा तसेच गर्भधारणेच्या व्यैक्तिक निवडीवर सुद्धा पाप-पुण्य,खानदान की इज्जत असले नियम लादलेत जेणेकी पुरूषाला स्त्रीवर संपूर्ण नियंत्रण मिळविता येणार
आणि या स्वार्थातूनच बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, सती प्रथा, केशवपन पद्धती, हुंडापद्धती… आणि अशा कित्येक तरी रूढीवादी प्रथा-परंपरा निर्माण झाल्यात. जेणेकी स्त्रियांचे आयुष्य गुराढोरांपेक्षाही दयनीय झाले.
पुरूषाच्या या स्वार्थाला सामाजिक मान्यता मिळावी म्हणून पुरूषाने त्याच्या नजरेत उपभोग्य वस्तू असलेल्या स्त्रीला गुलामगिरीत कैद करण्याहेतू व स्वतःला सोयीस्कर समाजाची निर्मिती व्हावी म्हणून खुळचट चालीरितींची, सामाजिक प्रथांची निर्मिती केली व त्याला ईश्वराचा आदेश समजावा म्हणून धर्माचे नाव दिले.पुरूषाने तथाकथित धर्माचा आधार घेत विद्या, जि तिन्ही लोकांत सर्वश्रेष्ठ आहे त्या विद्यार्जनाचे सर्व मार्ग स्त्रियांकरीता बंद केलेत.मग स्त्रीचे एकूण आयुष्य किंवा तिचे कर्तव्य म्हणजे चूल आणि मूल,स्त्री म्हणजे मूल जन्माला घालण्याचे यंत्र,लग्ना अगोदर बापाच्या घरी भांडी घासणे आणि लग्नानंतर नवऱ्याच्या घरी भांडी घासणे,स्वयंपाक करणे,त्याची मुलबाळ सांभाळणे आणि त्याला नित्याने शरीरसुख प्रदान करणे… तो दारूडा असेल, मारकुंडा असेल तो कसाही असला तरी ‘डोली में बैठकर आयी थी और अर्थी में लेटकर जाऊंगी’! या लोक म्हणी चे तंतोतंत पालन करीत निमूटपणे त्याला पती परमेश्वर म्हणून स्विकार करत त्याचा लहरी स्वभाव एकूणच लग्न निभावून घेण्याची जबाबदारी विनातक्रार अगदी चोखपणे पार पाडणे आणि या पिढीजात गुलामगिरीला स्वतः चे आयुष्य आणि स्त्रीचा परमधर्म समजणे हेच स्त्रीचे कर्तव्य असते!
बाकी याव्यतिरिक्त शिक्षण घेणे,स्वत:च्या आवडीनिवडी जोपासणे, स्वतःचे मत प्रकट करणे, करिअर घडवणे यासगळ्यांची स्त्रियांना गरज कशाला? आहे ना तिचा नवरा!
आणि राहिला प्रश्न आज वेगवेगळ्या क्षेत्रात स्वकर्तृत्वाने स्वतः च्या व्यक्तीमत्वाचा ठसा उमटविणाऱ्या स्त्रियांचा तर या ३०% स्त्रिया म्हणजेच अभिनेत्री, मॉडेल, राजकारणी, उद्योगपती… या सगळ्या एकतर सुदैवाने पुरोगामी, उच्चविद्याविभूषित घरांत जन्मलेल्या किंवा काही अतिश्रीमंत वर्गात जन्मलेल्या स्त्रिया असू शकतात. बाकी मध्यमवर्गीय कुटुंबासकट गावगाड्याचा विचार केला तर ‘लेकीचे नशीब लगपती नवरा’ या खुळचट समाजमान्य समजूतीमुळेच कित्येक कोवळ्या कळ्या सुमन होण्यापूर्वीच छाटल्या गेल्यात आणि आजही छाटल्या जात आहेत! जिथे धनाढ्य नवराच्या घरात ‘रानी बनके राज करेगी’ ही समजूत आहे वास्तविक ती कधीच राणी बनत नाही तर ती बनते ‘नोकरानी’!… पुरूषाला करून घालणारी, त्याचा लहरी स्वभाव, त्याची मुलबाळ सांभाळणारी, स्वतः चे मत, विचार नसलेली,स्वतः च स्वतंत्र अस्तित्व नसलेली फक्त आणि फक्त पुरूषाच्या शोभेची वस्तू!
ही युगानुयुगांपासून चालत आलेली गुलामगिरी मोडून काढण्याची वेळ आता आली आहे… आणि हे तेव्हाच शक्य होणार जेव्हा विद्या बाळ यांच्या ‘मिळून साऱ्याजणी’ या उपक्रमाच्या शीर्षकाप्रमाणेच एक स्त्री दुसऱ्या स्त्रीकडे सहानुभूतीच्या नजरेने बघून एकमेकींना सहकार्य करेल.
धाडसी स्त्रियांनी घेतलेल्या निर्णयांना पाठिंबा देत मिळून साऱ्याजणी पुरूषप्रधान संस्कृतीने लादलेल्या खुळचट चालिरितीं विरुद्ध बंड पुकारेल, लग्न हेच स्वतः चे करिअर न मानता…शिक्षण घेऊन किंवा आवडीनुसार कला, क्रीडा, साहित्य या विविध क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व निर्माण करून, चरितार्थाचे साधन मिळवून स्त्री स्वावलंबी बनेल.
कारण, एकीकडे पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहावर पोहोचणारा, २१ व्या शतकात जुन्या चालीरीतींना स्थान न देता समाजसुधारकांच्या विचारांचा भक्कम पाया असलेला व त्यास आधुनिकतेची जोड देऊन कल्याणकारी,पुरोगामी समाजरचनेसाठी प्रयत्नशील असलेल्या भारत देशात
आता या काळबाह्य गुलामगिरीचे काहीच स्थान असायला नको.आता या गुलामगिरीचा नायनाट झालाच पाहिजे…!

निकिता शालिकराम बोंदरे, नागपूर.
ई मेल – nikitabondre1234@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!