गैरवर्तन करणाऱ्या एसटीच्या चालक-वाहकां विरुद्ध विद्यार्थिनीं आक्रमक.
विद्यार्थिनींनी दिली देवळी पोलीस ठाण्यात तक्रार.देवळी:वर्धेकडून देवळीला येण्याकरिता एस.टी. महामंडळाच्या भरपूर बसेस उपलब्ध असतांनाही बऱ्याच बसेसचे चालक-वाहक हेकेखोरपणे देवळीला जाणाऱ्या प्रवाश्यांना देवळीला बसचा थांबा नसल्याचे खोटे कारण सांगून बसमध्ये चढण्यास मनाई करतात. मागे युवा संघर्ष मोर्चाने माहितीच्या अधिकारात देवळी व भिडी येथील ज्या बसेसचे थांबे आहेत ती माहिती घेऊन सर्वत्र उपलब्ध करून दिली होती. या आधारे काही विद्यार्थिनी वा महिला प्रवाश्यांनी बसमध्ये चढण्याचा प्रयत्न केल्यास वाहक त्यांना अपमानास्पद वागणूक देऊन बसच्या खाली जबरदस्तीने उतरवून देतात. दररोज कित्येक वर्धेवरून देवळीला येणारे प्रवाशी या अपमानास्पद वागणुकीने त्रस्त आहेत. बायपास झाल्यापासून प्रवाश्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महिला, विद्यार्थिनींना रात्री अपरात्री प्रवास करावा लागतो. आणि असा त्रास नेहमीच चालक वाहकांकडून होत असल्याच्या घटना घडल्या आहे.अशातच काल दु. २:३० वा. दररोज ये-जा करणाऱ्या देवळीतील विद्यार्थिनी व महिला वर्धा येथील बस स्थानकात बसची वाट पहात उभ्या असतांना नागपूर-नांदेड ही बस आली या बसचा देवळी येथे थांबा असूनही बसच्या वाहकाने सर्व विद्यार्थिनी व महिलांना बसमधून उतरून दिले व ही गाडी देवळीला थांबत नाही, तुम्ही या गाडीत चढल्याच कशा ? अशा प्रकारे मोठमोठयाने ओरडून सर्व देवळीतील प्रवाशांचा अपमान केला. काही विद्यार्थिनींनी ही सर्व माहिती युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांना फोनद्वारे दिली.त्यांनी या बसचा देवळीला थांबा असल्यामुळे सर्व प्रवाशांना जबरदस्तीने बसमध्ये बसण्यास सांगितले व स्वतः सहकऱ्यांसह पुलगाव चौक येथे थांबत असल्याचे सांगितले. ठरल्याप्रमाणे सर्व प्रवाशी जबरदस्तीने बसमध्ये चढले तर वाहक सांगू लागला की ही बस पंक्चर आहे व या बसला दुरूस्त व्हायला २-३ तास लागतील. तरीही विद्यार्थिनी उतरत नसल्याने नाईलाजाने बस देवळीला आणली नाहीतर ही बससुद्धा बायपासने सरळ यवतमाळला निघून गेली असती. परंतु
विद्यार्थ्यांनी लावली लालपरी थेट पोलीस स्टेशनला
बस देवळीला आली असता किरण ठाकरे व सहकाऱ्यांनी बसच्या वाहकाला याबाबत जाब विचारला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला.मात्र उपस्थित विद्यार्थिनींनी व महिलांनी आपबीती सांगितली व सार्वजनिक ठिकाणी वाहक व चालकाने अपमानस्पद बोलून गैरवर्तन केल्याने दोघांचीही पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करण्याची इच्छा असल्याचे सांगितले त्यामुळे बस मधील महिला व विद्यार्थिनींनी बस पोलीस स्टेशनमध्ये घेण्यास सांगितले. बस देवळी पोलीस स्टेशनवर पोहचल्यानंतर युवा संघर्ष मोर्चचे अध्यक्ष किरण ठाकरे यांनी विभागीय वाहतूक नियंत्रक धायडे यांच्याशी संपर्क करून संपूर्ण घटनाक्रम सांगितला. व चालक वाहकांना सक्त ताकीद देण्याची मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी विभागीय नियंत्रक यांनी इतर डेपोचे चालक वाहक ऐकत नसल्याची हतबलता दर्शवली.यावेळी पोलीस स्टेशन समोर नागरिकांनी मोठी गर्दी केली. हा प्रकार नेहमीचाच असून मुजोर चालक वाहकांविरुद्ध सक्त कारवाई व्हावी असा देवळीकर नागरिकांचा सूर होता.पोलीस स्टेशन देवळी येथे सर्व विद्यार्थिनी व महिलांनी वाहक व चालकाविरुद्ध सामूहिक तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे पोलीस अधिकारी एसटी महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून या घटनेची माहिती देणार असल्याचे सांगितले
सागर झोरे सहासिक न्यूज-24 देवळी