घराला लागलेल्या आगीत महिलेचा संसार उघड्यावर
By साहसिक न्युज 24
प्रतिनिधी /वर्धा:
समुद्रपूर तालुक्यातील बोथुडा गावातल्या महिलेच्या घराला लागलेल्या आगीत घरातील साहित्याची राखरांगोळी झाली.घरातील सिलिंडर काढण्यात यश आल्याने सिलिंडरचा स्फोट टळला.पण यात जिजा राजेंद्र वरभे यांचा संसारच उघड्यावर आला.
काल दुपारी १ वाजताच्या दरम्यान त्यांच्या घराला अचानक आग लागली.पाहता पाहता आगीने घर कवेत घेतले.यात घरातील कपडे,धान्य,भांडी,दूरचित्रवाणी संचासह जीवनावश्यक वस्तू खाक झाल्या.घराला आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी धैर्याने घरातील सिलिंडर बाहेर काढले,त्यामुळे सििंलडरचा स्फोट झाला नाही.घराला आगीने वेढा घातल्याने घरातील कोठलेही साहित्य बाहेर काढता आले नाही.गावातील नागरिकांनी येत आग विझविण्यास सहकार्य केले.यात यशवंत चाटे,वीजवितरणचे कर्मचारी ठोंबरे,गावातील मोहन देवढे,ग्रामपंचायतीचे कर्मचारी महेंद्र गेडाम तसेच गावातील युवकांनी सहकार्य केले.
सरपंच सारिका इंगोले,ग्रामसेवक इश्वर परतेकी,मंडळ अधिकारी टी.एन.बागडे,तलाठी सूरज नरताम,यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानीचा पंचनामा केला.