“जल है तो कल है”… वर्धा जिल्ह्यात शुक्रवार दिनांक 25 मार्च पासून 46 ग्रामपंचायतचा पाणी पुरवठा बंद करण्याचे आदेश

प्रतिनिधी/ वर्धा:
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा करण्यासाठी सुविधा देण्यात येते. प्रादेशीक पाणी पुरवठा योजनेतील पाणी पट्टीचे जिल्ह्यातील 46 ग्रामपंचायतकडे 31 मार्च 2021 पर्यंतचे 3 कोटी 35 लाख 7 हजार 251 रुपये आणि चालू वर्षातील 75 लाख असे 4 कोटी थकीत असल्याने या ग्रामपंचायतींचा पाणी पुरवठा उद्या 25 रोजीपासून खंडीत करण्यात येणार असल्याची माहिती जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.
जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत कार्यरत असणार्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण अत्यंत कमी आहे त्यामुळे यासंदर्भात संबंधित ग्रापंतींना गेल्या सहा महिन्यात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभाच्या ठरावानुसार वेळोवेळी वसुली नोटीस देण्यात आल्या. त्याचबरोबर सर्व सरपंच आणि ग्रामसेवक यांची बैठक सुद्धा जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात आली होती. परंतु, बहुतांश पाणीपुरवठा योजनांमध्ये वसुलीचे प्रमाण अजूनही दिले लक्ष्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे संबंधित पाणीपुरवठा योजनांचे जा ग्रामपंचायतीने पाणीपट्टी वसुली भरली नसेल त्यांचे पाणी कपात करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे डॉ. ओम्बासे यांनी सांगितले. जिल्ह्यातील 46 ग्रामपंचायतकडे 31 मार्च 2021 पर्यंत 3 कोटी 35 लाख 7 हजार 251 रुपये तसेच 2021-22 चालू वर्षाचे 78 लाख 48 हजार 940 असे जवळपास 4 कोटी रुपये थकीत असल्याने 31 ऑक्टोबर 2021 पूर्वी 20 टक्के, 30 नोव्हेंबर 2021 पूर्वी 40 टक्के तर 31 डिसेंबर 2021 पूर्वी 60 टक्के वसुलीचे उद्दीष्ट देण्यात आले होते. मात्र, ग्रामपंचायतींनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. ओम्बासे म्हणाले.