तुलसी विवाह विषेश…

0

साहसिक न्युज24
ब्यूरो रिपोर्ट:

भारतीय संस्कृती मध्ये तुळशीला फार महत्व आहे, भगवान विष्णू याना तुळस प्रिय असल्यामुळे तिला हरिप्रिया असेही संबोधले जात असे, जर आपल्याला एखादी वस्तू देवाला अर्पण करावयाची असेल तर ती आपण तुळशी रोपाच्या मुळापाशी अर्पण करतात का म्हणजे ती वस्तू इष्ट देवतेकडे पोहचते अशी समजूत आहे, दिवाळी संपली की, सर्वांना वेध लागतात ते तुलसीच्या लग्नाचे, दिवाळी सण झाल्यानंतर दरवर्षी तुळशीचे लग्न थाटामाटात लावले जाते, घराच्या अंगणामध्ये असणाऱ्या तुळशी वृंदावनाला सजवण्यात येते. तुळशी वृंदावन, तसेच कुंडी रंगवून त्यावर राधा-कृष्ण चे चित्र काढण्यात येते.
तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे, कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा मुर्हत असतो, तुळशीचे दर्शन पाप नाशक असून आणि तिची पूजा व विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते व मोक्ष प्राप्ती होते.
तुळशी विवाह म्हणजेच तुळशी वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण याच्याशी विवाह प्रबोधिनी एकादशीपासून करण्याची पूजोत्सव प्रथा आहे.
तुळशीच्या रोप मध्ये अलौकिक औषधी गुणधर्म आहे आणि मानवी जीवनात तुळशीचे फार मोठे महत्व आहे कारण ती एकाचवेळी अनेक रोगांचे निर्मुलन करते. अशी ही गुणकारी तुळस प्रत्येक घराच्या अंगणात असावी असे पूर्वजांनी सांगून ठेवले आहे.
सुरवातीच्या काळी तुळशी चे रोप हे सर्वांच्या दारी असायचे, सकाळी तुलसी च्या रोपास पाणी घालून व संध्याकाळी तिथे दिवा लावून स्त्रिया पूजा करीत असे व प्रदक्षिणा घालीत असत , त्यामुळे आरोग्य चांगले राहायचे.
तुळशी चे रोप हे मोट्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्साइड हा विषारी वायू शोषून, शुद्ध आक्सिजन प्राणवायूचा पुरवठा करते, म्हणूनच आयुर्वेदातही तुळशीला फार महत्व आहे.

काय आहे तुळशीच्या लग्नाची गोष्ट
तुळशीचा विवाह आणि पूजा मनोभावाने केल्याने भगवाण विष्णू आणि लक्ष्मी माता प्रसन्न होते. कारण, पोथी-पुराणात सांगितलेल्या कथेनुसार तुळस ही लक्ष्मीचे तर भगवान विष्णूने शाळीग्रामचे रुप धारण केले होते. त्यांनी असे का केले याचे उत्तर ब्रह्मवैवर्त पुरानातील कथेत मिळते.

कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी होय. असे म्हटले जाते कि या दिवशी भगवान श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे सुद्धा म्हणतात. हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे. तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतील त्या सर्वांची समाप्ती करतात व चातुर्मासात जे पदार्थ वर्ज्य केले असतील ते पदार्थ ब्राह्मणाला दान करून मग स्वत: सेवन करतात.

तुलसी विवाह विधी

आपल्या घरातील कन्या मानून, घरातील तुळशी वृंदावनाची – तुळशीचे रोप असलेल्या वृंदावनाची किंवा कुंडीची रंगरंगोटी करतात व तिला छान सजवितात. स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा केली जाते, त्यानंतर त्यांना हळद तेल लावून मंगलस्नान घालण्यात येतं. तुळशीला सर्व सौभाग्य व अलंकारांनी जसे की, गजरा, मंगळसूत्र, हिरवा चूडा, जोडवी यांनी सजवितात. बोर, चिंच, आवळा, सिताफळ त्यात ठेवतात. दाराला तोरण व मांडव म्हणून ऊसाची वा धांडयाची खोपटी ठेवतात. पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. कर्त्याने यानंतर तुळशीचे कन्यादान करावे व नंतर मंत्रपुष्प आणि आरती करावी असा संकेत आहे. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे. या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची पद्धती आहे. घरातील सवाष्णी खण नारळ, सूपारीने तुळशीची ओटी भरतात. या दिवशी प्रसादाला दहीपोहे, हरभरा डाळीची उसळ. अनारसे, तिळाचे लाडू असा श्रीकृष्णाच्या आवडीचा बेत असतो. लहान मुले फुलबाज्या, अनार व फटाके उडवून आनंद साजरा करतात.

तुलसी विवाह कथा

जालंधर नामक दैत्याने कठोर तप करून वर मिळवले. यानंतर तो उन्मत्त आणि अनियंत्रित बनला. त्याची पत्नी वृंदा ही पतिव्रता असून तिची पुण्याई त्याच्या पाठीशी होती. यामुळे त्याचा वध करणे कोणास शक्‍य होत नव्हते. एक दिवस त्याची मजल पार्वतीकडे वाईट दृष्टीने पाहण्यापर्यंत पोहोचली. शंकराने त्याच्याशी घनघोर युद्ध आरंभले. जालंधराचा वध करण्यासाठी त्याची पतिव्रता पत्नी वृंदा हिच्या पतिव्रत्याचा भंग करणे आवश्‍यक होते. ही कामगिरी विष्णूवर सोपविण्यात आली. विष्णूने जालंधराचे रूप धारण करून आपले कार्य पार पाडले. हे जेव्हा वृंदेला समजले, तेव्हा तिने देहत्याग केला. परंतु देहत्याग करते वेळी तिने विष्णूला दगड (शाळिग्राम) होण्याचा शाप दिला. विष्णूनेही तिला तुळशीचे रोप होण्याचा प्रतिशाप दिला. परंतु वृंदेच्या पतिव्रत्यामुळे संतुष्ट होऊन विष्णूने तिला वरही दिला, की तुळशीची पूजा केली जाईल आणि या घटनेची स्मृती म्हणून शाळिग्रामाशी, म्हणजेच विष्णूशी, तुळशीचे लग्न लावले जाईल.

तुलसी विवाह कश्या प्रकारे केला जातो?

तुळशीचे लग्न थाटामाटात लावले जाते, घराच्या अंगणामध्ये असणाऱ्या तुळशी वृंदावनाला सजवण्यात येते. तुळशी वृंदावन, तसेच कुंडी रंगवून त्यावर राधा-कृष्ण चे चित्र काढण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!