दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी,रामदास आठवले

0

Ø दिव्यांगांना साहित्य वाटपाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

Ø वर्धा तालुक्यातील ८२६ दिव्यांगांना साहित्याचे वाटप

Ø प्रत्येक तालुक्यात होणार साहित्य वाटपाचा कार्यक्रम

वर्धा: 23 सप्टेंबर (जिमाका) दिव्यांग व्यक्ती शरीराने अपंग असला तरी बुद्धीने मात्र तो हुशार असतो.या व्यक्तींना त्यांच्या दिव्यांगत्वावर मात करत मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत आहे.या योजनांची चांगली अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
चरखा सभागृह येथे जिल्हा प्रशासन व समाज कल्याण विभागाच्यावतीने अलिम्को कंपनी मार्फत दिव्यांगांना साहित्य वितरणाच्या जिल्हास्तरीय शुभारंभाप्रसंगी आठवले बोलत होते. कार्यक्रमाला खा.रामदास तडस, आ.डॉ.पंकज भोयर,जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे,सेवाग्रामच्या सरपंच सुनिता ताकसांडे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड,जिल्हा नियोजन समिती सदस्य सुनील गफाट,जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजय आगलावे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्राजक्ता इंगळे, मुख्याधिकारी राजेश भगत आदी मंचावर उपस्थित होते.
दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारी नोकरीमध्ये आरक्षणासोबतच शिष्यवृत्ती योजना, रेल्वेसह बसमध्ये प्रवास सवलत आदी योजना राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्यावतीने दिव्यांगांसाठी सुगम्य भारत अभियान राबविण्यात येत असून या अभियानांतर्गत विमानतळ,रेल्वे स्टेशन,बस स्थानक येथे त्यांच्यासाठी सोई सुविधा निर्माण करण्यात आल्या आहे.सरकारी शाळांमध्ये शौचालय,रॅम्पची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. दिव्यांगांना राहण्यासाठी अपंग पुनर्वास केंद्र निर्माण करण्यात आले असल्याचे पुढे बोलतांना रामदास आठवले यांनी सांगितले.
राज्यातील ऑनलाईन नोंदणी करण्यात आलेल्या १७ लाख दिव्यांगांना दिव्यांग ओळखपत्राचे वाटप करण्यात आले असून शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ या दिव्यांगाना देण्यात येत आहे.या योजनांचा लाभ दिव्यांगांनी घ्यावा, असे आवाहनही यावेळी रामदास आठवले यांनी केले.
जिल्ह्यात सर्वाधिक दिव्यांगांची नोंदणी – खा.रामदास तडस
दिव्यांगांना अलिम्को कंपनीमार्फत कृत्रिम अंग साहित्याचे वाटप करण्यात येत आहे.त्यासाठी कंपनीच्यावतीने मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरामध्ये विदर्भात सर्वाधिक नोंदणी वर्धा जिल्ह्यातून झाली. जिल्ह्यातील ४ हजार दिव्यांगांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी वर्धा तालुक्यातील आज ८२६ पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना साहित्याचे वितरण करण्यात येत आहे.तालुकास्तरावर असेच कार्यक्रम घेऊन वाटप करण्यात येणार असल्याचे खा.तडस यांनी सांगितले.
समाजातील प्रत्येक घटकातील लाभार्थ्यांना लाभ देण्याचे कार्य राज्य शासन करीत आहे. दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन विविध योजना राबवित असून या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी आ.डॉ. पंकज भोयर यांनी केले.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिव्यांगांना मोफत अंग साहित्य वितरण करण्यासाठी जिल्ह्यात तालुकास्तरावर मोजमाप शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मोठ्या प्रमाणावर दिव्यांगांनी साहित्यासाठी नोंदणी करुन सहभाग नोंदविला असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेच्यावतीने दिव्यांगांसाठी सेस फंडातून विविध योजना राबविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
यावेळी मान्यवरांच्याहस्ते दिव्यांग लाभार्थ्यांना तिनचाकी सायकल, व्हील चेअर, कर्णयंत्र, वॉकर आदी विविध प्रकारच्या साहित्याचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे संचलन संध्या सावरकर यांनी केले तर आभार प्राजक्ता इंगळे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव,नागरिक उपस्थित होते. दिव्यांगांना साहित्य वाटपाचे असेच कार्यक्रम सर्वच तालुक्यात घेतले जाणार आहे.

       अविनाश नागदेवे सहासिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!