देवळी -/ स्थानिक विदर्भ केसरी माजी खा. रामदास तडस इनडोअर स्टेडियमवर शुक्रवार रोजी २४ जानेवारी व शनिवार रोजी २५ महिलांच्या राज्यस्तरीय कुस्ती दंगलीचे आयोजन केले आहे.या कुस्ती दंगलीत संपूर्ण महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यांतील ४०० महिला खेळाडू सहभागी होत आहेत. देवळी व वर्धा कुस्तीगीर संघ आणि देवळीच्या सार्वजनिक बजरंग व्यायाम शाळेवतीने या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.कुस्ती स्पर्धा दिवस व रात्र या दोन्ही सत्रात होणार आहे.५ हजार प्रेक्षक हे सामने पाहू शकणार आहेत.स्टेडियम इनडोअर असून, सोयीसुविधांनी सुसज्ज आहे. प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था असलेल्या खुच्र्यांना सेंद्रिय रंग देण्यात आला आहे.तसेच स्टेडियममधील लाइटिंग आकर्षक असून,भव्यदिव्य मंचामुळे स्टेडियमची सुंदरता वाढली आहे.लाल मातीची जागा आता गादीने घेतली आहे. गादीवर महिलांच्या कुस्त्या होणार आहेत.महिला खेळाडूंच्या निवासाची व भोजनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. खेळाडूंशिवाय स्टार खेळाडूंचा सहभाग या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहेलवान अमृता पुजारी कोल्हापूर,भाग्यश्री कोळी पुणे,प्रतीक्षा बागडी,सांगली, वैष्णवी पाटील कल्याण,स्वाती शिंदे कोल्हापूर,धनश्री खंड नगर, नंदिनी साळुंखे कोल्हापूर, आश्लेषा बागडे सोलापूर या सुद्धा सहभागी होत आहे.पंच,अधिकारी,कोच यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. खेळाडूंना कोणताही त्रास होऊ नये,याकरिता आयोजक मंडळी माजी खा.तडस यांच्या मार्गदर्शनात विशेष काळजी घेत आहेत.या स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरणाकरिता विशेष अतिथींना निमंत्रित करण्यात आले आहे.देवळीसोबतच जिल्ह्यातील कुस्तीप्रेमींसाठी ही स्पर्धा मेजवानी ठरणार आहे.