निराधार, श्रावणबाळचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करा – खा. रामदास तडस
By vसाहसिक न्युज 24
प्रतिनिधी / वर्धा :
शासनाच्यावतीने संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना अशा वेगवेगळया योजना राबविण्यात येत असून या योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहिन्याला ठराविक अनुदान दिले जाते. परंतु या गरीब निराधार लाभार्थ्यांच्या खात्यात विलंबाने रक्कम जमा होत असल्याने त्यांची अडचण होते. त्यामुळे आर्थिक सहाय्याच्या या योजनांचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे, असे निर्देश खा. रामदास तडस यांनी दिले.
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक खा. तडस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात पार पडली. त्यावेळी त्यांनी सदर निर्देश दिले. बैठकीला आ. रामदास आबंटकर, आ. दादाराव केचे, आ.समिर कुणावार, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद यांच्यासह विविध विभागाचे जिल्हा स्तरीय अधिकारी उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या वतीने सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. घरकुल, स्वच्छ भारत अभियान, जलजीवन मिशन, कौशल्य प्रशिक्षण, पोषण आहार, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, ग्राम सडक योजना, बाल विकास, ग्राम ज्योती अभियान, पिकविमा योजना, शिक्षण, सिंचन, भूमी अभिलेख्यांचे आधुनिकीकरण आदी प्रमुख योजनांचा समावेश आहे. या योजनांचा योजनानिहाय आढावा खा.तडस यांनी घेतला. केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.जलजीवन मिशनची कामे वेळेत पूर्ण झाली पाहिजे. या कामांसाठी कंत्राटदारांना कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देऊ नये. घरकुल सर्वसामान्य गरीब व्यक्तींसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. घरकुलाच्या लाभार्थ्यांना वेळेत रक्कम उपलब्ध होणे आवश्यक आहे. याच्या पाठपुराव्यासाठी नोडल अधिका-यांची नेमणूक करण्यात यावी. ज्या नगर परिषदांनी 70 टक्के पेक्षा जास्त उपयोगिता प्रमाणपत्र उपलब्ध करुन दिले आहे. अशा नगर पालिकांना केंद्र व राज्यांचा पुढील निधी प्राप्त करुन घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा. कौशल्य विकासांतर्गत दिलेली प्रशिक्षणे व यातील लाभार्थ्यास उपलब्ध झालेल्या रोजगाराची माहिती पुढील बैठकीत ठेवण्याचे निर्देश खा. तडस यांनी दिले. प्रधानमंत्री ग्राम सडक व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून काही ठिकाणी निकृष्ठ दर्जाची कामे झालेली आहे. या योजनेतून जिल्हयात झालेल्या सर्वच रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडीट करण्यात यावे. लाभार्थ्यांना पाचशे चौ.फुट इतक्या जमिनीचे पट्टे वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्याच्या सूचना देखील खा. तडस यांनी केल्या. नाफेडने खरेदी बंद केल्याने शेतक-यांचा माल बाजार समित्यांच्या आवारामध्ये पडून आहे. ही खरेदी सुरु करण्याबाबत पाठपुरावा करण्यात यावा. यावेळी पोहणा व कोटंबा येथील उपकेंद्राची दुरुस्ती, सेलू पंचायत समिती येथे महिलांसाठी शौचालय बांधकाम, शालेय पोषण आहाराच्या विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडणे या विषयावरही चर्चा झाली.बैठकीत आ. रामदास आबंटकर, आ. दादाराव केचे, आ.समिर कुणावार यांनी निराधारांना अनुदान वितरण, पट्टेवाटप, ग्राम सडक योजनेतील कामाचा दर्जा, घरकुल लाभार्थ्यांना निधी वितरण, पाणी पुरवठयाची कामे या विषयावर बैठकीत महत्वपूर्ण मुद्दे सादर केले. बैठकीत विषयाचे सादरीकरण प्रकल्प संचालक विश्वास सिद यांनी केले.