पोलिसातील कर्तव्य संपण्याआधीच अपघाताने संपला आयुष्य!!
साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/वर्धा :
गिरड पोलिस ठाण्यात पोलिस वानह चालक पदावर असलेले सहायक पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र बेलखेडे यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यात नरेंद्र बेलखेडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नागपूर येथे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. नरेंद्र बेलखेडे हे रविवार दिनांक 9 रोजी हिंगणघाट येथून एम. एच. 32 ई. 4194 क्रमांकाच्या दुचाकीने कर्तव्यावर जाण्यासाठी गिरड पोलिस ठाण्यात येत असताना गिरड ते जाम मार्गावरील वडगाव ते खैरगाव या दरम्यान असलेल्या पुलावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात नरेंद्र बेलखेडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना लगेच समुद्रपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. नरेंद्र बेलखेडे यांच्या सेवानिवृत्तीला 7 ते 8 महिन्याचा कालावधी बाकी होता. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार सुनिल दहिभाते यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.