प्रेयसीने लग्नाला नकार दिल्याने तरुणाने खाल्ल्या पॅरासिटामॉल! गोळ्यांचा ओव्हरडोज अन्… युवकाच्या जीवावर बेतले
प्रमोद पाणबुडे / वर्धा:
प्रियसीने लग्नाला नकार दिल्याने तरूणाने तिच्या विरहात वेदनाशक पॅरासिटामॉल व क्रोसिनच्या गोळ्या १- २ नव्हे, तर तब्बल ३० गोळ्यांचा ओव्हरडोज खाल्ल्यामुळे युवकाच्या जीवावर बेतले सेवाग्रामच्या रुग्णालयात जवळपास ४० दिवस मृत्यूशी झुंज देत उपचार घेत होता. मात्र, डॉक्टरांना त्याला वाचविण्यात यश आले नाही. अखेर ९ मार्चला कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथे उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात सेवाग्राम रुग्णालयाने दिलेल्या माहितीवरून वर्धा शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करत आहे. वेदनाशक पॅरासिटामॉल व क्रोसिन या गोळ्या सहज मेडिकल स्टोरमध्ये मिळतात.
मात्र, याचा गैरवापर एका युवकाने केला. त्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. २७ वर्षीय रजत मेंढे असे मयत तरुणाचे नाव असून तो शिवाजी चौक येथील रहिवासी आहे. वर्ध्याच्या एका खासगी फायनान्स कंपनीमध्ये तो सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. रजत मेंढे हा २९ जानेवारी रोजी रात्री कर्तव्यावर आला. सकाळी तो तेथेच झोपून होता. ३० जानेवारी रोजी सकाळी त्याने वडिलांना फोनवर संपर्क साधत प्रकृती बिघडली असल्याची माहिती दिली. वडिलांनी वर्ध्यात येत त्याला सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी नेले होते.
सेवाग्राम रुग्णालयात रजतवर उपचार सुरू करण्यात आले. डॉक्टरांनी विचारपूस केली असता, त्याने पॅरासिटामॉलच्या गोळ्या खाल्ल्याचे सांगितले. सेवाग्राम रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, ९ मार्च रोजी रजतचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुरूवातीला सेवाग्राम पोलिसांत नोंद करण्यात आली. त्यानंतर प्रकरण वर्धा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले होते. वर्धा पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांनी सदर प्रकरण गंभीर असल्याचे पाहून तपास सहाय्यक पोलीस अधिकारी नितीन रायलकर व पोशि सत्यप्रकाश इंगळे यांच्याकडे सोपविला तपासी अधिकारी यांनी आपली तपास यंत्रणा फिरवत माहिती गोळा केली आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार रजत राजपाल मेंढे (वय-२७) याचे एका तरुणीवर जीवापाड प्रेम होते. प्रेमाचे रुपांतर लग्नात व्हावे, अशी या तरुणाची इच्छा होती. मात्र, तरुणीने लग्नास नकार दिला. त्यामुळे खचला गेला त्याने सहज मिळणाऱ्या पॅरासिटामॉल आणि क्रोसीनच्या गोळ्या मेडिकल स्टोर मधून घेतल्या व रात्री ड्युटीवर गेला एकटाच कर्तव्यावर असल्यामुळे तरूणीचा नकार त्याला भेडसावत होता. बॅगमध्ये आणलेल्या पॅरासिटामोल आणि क्रोसिनच्या गोळ्यांचा ओव्हर डोस त्याने घेतला काही काळानंतर त्याला जास्तच अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्याने वडिलांना फोन केला. वडीलही तात्काळ त्याच्याकडे पोहोचले आणि सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू झाला होता.
मात्र, चाळीस दिवसांनंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आणि लग्नाच्या नकारामुळे घेतलेल्या गोळ्यांचा ओव्हर डोसमुळे त्याला आपला जीव गमवावा लागला हे दुर्दैवीच म्हणावे लागेल. अनेकदा छोट्या मोठ्या आजारासाठी नागरिक डॉक्टरांच्या सल्याविना औषधोपचार घेत असतात. अनेकांना याचा लाभ होतो. मात्र, काही त्याचा गैरवापर करताना आपल्याला दिसत आहेत. त्या औषधाचे दुष्परिणाम सुद्धा होतात. त्यामुळे फक्त आरोग्यासाठीच सावधतेने गोळ्या सेवन करा अन्यथा जीव गमवावा लागू शकतो.