🔥महावितरणला पंधरा दिवसाचा अल्टीमेटम, स्मार्ट मिटरची सक्ती रद्द न केल्यास नागरिकांचा आक्रमक मोर्चा ..🔥स्मार्ट मीटरचे बाँक्स फोडून स्मार्ट मिटर सक्तीचा नागरिकांनी केला निषेध.🔥राष्ट्रवादीचे अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात नागरिकांचे महावितरनाला निवेदन
🔥हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील सर्व सामान्य जनतेवर लादण्यात आलेली स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करण्याकरिता नागरिकांचा एल्गार…
हिंगणघाट -/ हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या वतीने आज महावितरणच्या उपविभागीय अभियंता, हिंगणघाट यांना विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ रद्द करावी, बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर काढून पूर्वीप्रमाणे जुने वीज मीटर बसवावेत, वीज ग्राहकांसाठी स्वतंत्र तक्रार केंद्र व विशेष तक्रार निवारण चमू स्थापन करावा, वीजेचे प्रति युनिट दर कमी करावेत तसेच मीटर, डेटा आणि बिलिंग प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता ठेवावी, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.
स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक ग्राहकांना अवास्तव वीजबिले, बिलांमधील तफावत, तांत्रिक अडचणी आणि वीजपुरवठ्याशी संबंधित विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. स्मार्ट मीटर आणि जुन्या मीटरच्या बिलामध्ये मोठी तफावत दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून महावितरणच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. जनतेचा विश्वास संपादन न करता स्मार्ट मीटरची सक्ती करणे अन्यायकारक असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अतुल वांदिले यांनी केला.
याशिवाय, हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील शहरी व ग्रामीण भागातील हजारो वीज ग्राहकांना वारंवार वीज खंडित होणे, कमी-जास्त दाबाचा वीजपुरवठा, चुकीची वीजबिले, जळालेले ट्रान्सफॉर्मर, नवीन वीज जोडणीतील विलंब, तुटलेल्या तारा, खांबांची दुरवस्था अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. या सर्व तक्रारींचे जलद आणि प्रभावी निवारण व्हावे यासाठी स्वतंत्र वीज ग्राहक तक्रार केंद्र स्थापन करून अभियंते, तांत्रिक कर्मचारी आणि ग्राहक सेवा प्रतिनिधींचा विशेष तक्रार निवारण चमू नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली. तसेच दूरध्वनी, व्हॉट्सअॅप, ई-मेल आणि ऑनलाइन माध्यमातून तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली. वाढती महागाई लक्षात घेता सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, लघुउद्योग, छोटे व्यावसायिक आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी वीजेच्या प्रति युनिट दराचा पुनर्विचार करून तो कमी करण्यात यावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच वीज ग्राहकांना मीटर रीडिंग, दैनंदिन वीज वापर, बिलाची गणना, प्रति युनिट दर आणि विविध आकारणी यांची संपूर्ण व पारदर्शक माहिती उपलब्ध करून देऊन बिलिंग प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणण्याची मागणी करण्यात आली.
अतुल वांदिले यांनी महावितरणला स्पष्ट इशारा देत सांगितले की, या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आक्रमक मोर्चा काढण्यात येईल.त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला संपूर्णपणे महावितरण प्रशासन व शासन जबाबदार राहील असे निवेदन मुख्यकार्यकारी अभियंता महावितरण यांना देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, प्रदेश सरचिटणीस सुनिल राऊत, आप नेते अनिल जवादे, समुद्रपूर तालूका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, हिंगणघाट तालूका अध्यक्ष मिलिंद कोपुलवार, सुनिल डोंगरे, विनोद वानखेडे, माजी नगरसेवक अशोक पराते, दशरथ ठाकरे, प्रशांत घवघवे, शहराध्यक्ष बालू वानखेडे, अमोल बोरकर, शुभांगी डोंगरे, नगरसेविका शितल बोरकर, नगरसेविका मनिषा लोणकर, सिमा तिवारी, किरण चौहान, जितू कुकसे,मो.अली अजानी,राजु भाईमारे, अनिल बुलानी,संजय नेहरोत्रा,विजय शर्मा, गौतम कोठारी, बालाजी गहलोत, शेखर जाधव, सुभाष चौधरी, प्रशांत लोणकर,वृषभ गहुकर, अब्रार फारुकी, सचिन पारसडे, प्रवीन कलोडे, सुरेश गायकवाड, मनोज कोटकर यांच्यासह हिंगणघाट परीसरातील वीज तक्रारदार, व वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.