रूग्णालयात कैद्यांची हाणामारी; चार पोलीस निलंबीत
साहसिक न्यूज24
प्रतिनिधी / जळगाव:
जिल्हा रूग्णालयात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे.या संदर्भातील वृत्त असे की, जळगाव जिल्हा सामान्य रूग्णालयात रविवारी रात्री कैद्यांमध्ये हाणामारी झाली होती. जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल कैदी सतीश गायकवाड व दशरथ महाजन या दोघांमध्ये रविवारी रात्री कैदी वॉर्डात झाल्यानंतर हा प्रकार घडला होता. या प्रकरणी वॉर्ड क्र.९ मधील डॉक्टरांनी गोपनीय अहवाल वैद्यकीय अधिष्ठातांना दिला. यात रुग्णालयाच्या वॉर्डात येणारे कैदी पोलिसांच्या उपस्थितीत दारू प्राशन करून धुमाकूळ घालतात असे नमूद करण्यात आले होते. या कृत्यांमुळे जिल्हा रुग्णालयातील शेजारच्या वॉर्डात दहशत पसरली असून, रुग्णांना त्रास होतो आहे, असे नमूद केले होते.
या प्रकाराची पोलीस प्रशासनानेही गंभीर दखल घेतली होती. पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी स्वत: या प्रकरणी चौकशी केली असता यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा दिसून आला.यासाठी त्यांनी सीसीटिव्ही फुटेज तपासले असता अनेक गंभीर बाबी उघड झाल्या. या अनुषंगाने चौकशीअंती डॉ. मुंढे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणावर ठपका ठेवत संदीप पंडितराव ठाकरे,पारस नरेंद्र बाविस्कर, किरण अशोक कोळी, राजेश पुरुषोत्तम कोळी या चौघा पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी तसे आदेश जारी केले आहेत.