रेती तस्कराचा आत्महत्येचा फंडा, तहसीलदार समोर केले विष प्राशन
By साहसिक न्युज 24
प्रतिनिधी/वर्धा:
समुद्रपुर तालुक्यात सुरू असलेल्या वाळू तस्करीवर आळा घालण्याच्या नावावर प्रशासनाकडून वाळूचा टिप्पर पकडण्यात आला. हा पकडलेला टिप्पर सोडविण्यासाठी तालुक्यातील मांडगाव येथील वाळू व्यावसायिकाने चक्क तहसीलदारांच्या कक्षात त्यांच्या समोरच विष प्राशन केले. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. तीन) दुपारच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अन्नपूर्णा बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स या नावाने प्रवीण शकर शेंडे (वय ३५) रा. मांडगाव यांचा वाळूचा व्यवसाय आहे. वना नदी पात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करताना महसूल विभागाच्या पथकाने प्रवीण शंकर शेंडे यांचे टिप्पर जप्त केले. यामुळे प्रवीणची आर्थिक कोंडी झाल्याने तो अस्वस्थ होती. शुक्रवारी दुपारच्या सुमारास टिप्पर सोडण्यासाठी त्याने तहसील कार्यालयात तहसीलदाराच्या कक्षात जाऊन तहसीलदार राजू रणवीर यांच्याकडे टिप्पर सोडण्याची विनवणी केली.
तहसीलदार राजू रणवीर यांनी सदर प्रकरणातील अहवाल उपविभागिय अधिकाऱ्यांकडे सुपुर्द करण्यात आला असल्याने हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा असे सुचविले. यामुळे व्यथित होऊन प्रवीण शेंडे यांनी आपल्या खिशातून विषाचा डब्बा काढून तोंडाला लावला. ही बाब तहसीलदारांच्या यांच्या निदर्शनास येताच त्यांनी स्वतःच्या खुर्चीवरून उठून प्रवीणकडे धाव घेऊन त्याच्या हातातील विषाची डब्बा खाली पाडला. या वेळात दोन ते तीन घूट विष प्रवीण शेंडे यांच्या घशात गेले असा प्राथमिक अंदाज आहे.
तहसीलदारांनी तातडीने प्रवीण शेंडे याला उपचारासाठी तहसील कार्यालयाच्या वाहनाने समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक होऊ नये यासाठी त्याला पुढील उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.