वर्ध्यातील न्यायालयाची सुरक्षा वाढविताच न्यायालयात प्रवेश करणाऱ्याकडे सापडले शस्त्र

न्यायालयाच्या द्वारावर मेटल डिटेक्टर तैनात
प्रतिनिधी / वर्धा:
वर्ध्याच्या न्यायालय परिसरात महिला वकीलावर चाकू हल्ला झाल्याची घटना मंगळवारी घडली होती. या घटनेनंतर न्यायालय परिसरात कडेकोट सुरक्षा वाढविण्यात आली आहे. न्यायालयाच्या द्वारावरच मेटल डिटेक्टर लावण्यात आले आणि पोलीस देखील तैनात करण्यात आलेय. यावेळी न्यायालयात येणाऱ्या प्रत्येकाची मेटल डिटेक्टरने तपासणी केली जात असतानाच एकाच्या खिशात धारदार चाकू आढळून आला आहे. चाकू सापडल्याने पुन्हा खळबळ निर्माण झालीय.
वर्ध्याच्या न्यायालय परिसरात नेहमीप्रमाणे आज कामकाज सुरू झाले. मंगळवारच्या चाकू हल्ल्याच्या घटनेनंतर सुरक्षा वाढविली. यावेळी प्रत्येकाला तापसणी करून न्यायालयात सोडले जात होते. यात कर्मचारी आणि वकिलांचा देखील समावेश होता. दरम्यान दुपारच्या सुमारास वर्ध्याच्या आनंद नगर येथील दोघे न्यायालयात आले. त्यापैकी एकाने मेटल डिटेक्टर वर तापसणी करून आत प्रवेश केला. पण दुसरा आनंद नगर येथील प्रज्वल पाझारे याने मात्र ही तपासणी करण्यासाठी टाळाटाळ केली. यावेळी त्याने पळ काढताच नियुक्त असलेले पोलीस शिपाई अभिनंदन लाउत्रे यांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याची तपासणी करण्यात आली. त्याच्याकडे खिश्यात धारदार चाकू आढळून आला. पोलिसांनी त्याला शहर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्याच्यावर हत्यार कायद्यांतर्गत कारवाई केली जात आहे.