वर्ध्यात अंगणवाडीच्या बालकांना निकृष्ट पोषण आहार ; अंगणवाडी सेविकांचा आक्षेप

साहसिक न्यूज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
अंगणवाडी म्हटले की चिमुकल्यांना धडे गिरविण्यासोबतच शारीरिक वाढीसाठी अन्न पुरविणारे केंद्र देखील डोळ्यासमोर उभे राहते. पण याच केंद्रावरून चिमुकल्यांना सोंडे आणि मुंग्या असलेले अन्न वाटप होत असेल तर मन सुन्न होणारच. वर्ध्याच्या 1 हजार 281 अंगणवाडी केंद्रावर चार महिन्याचा शासकीय आहार आणि किराणा पोहचला आहे. एकाच वेळी चार महिन्याचा आहार पोहचला खरा पण तो आहारच निकृष्ट दर्जाचा आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत चालणाऱ्या या केंद्रावर वयवर्षं 3 ते 6 वयोगटासाठी पोषण आहार देण्यात आला आहे.
माहे 15 मे ते 15 सप्टेंबर अशा चार महिन्याचा आहार व किराणा आँगस्ट मध्ये देण्यात आला. त्यापैकी तिन महिन्याचा आहार कोरडा वाटायला सांगण्यात आले तर एका महिन्याचा आहार शिजवून खावू घालण्यासाठी सांगितले गेले . परंतु अंगणवाडी केंद्रात इंधन व साहित्य दिलेच नाही. जवळपास साठ टक्के अंगणवाडीमध्ये निकृषदर्जाचा पोषण आहार पोहचला आहे आणि तो आदेश असल्याने वाटण्यात देखील आला आहे. वटाणे, गहू, हरबरा आणि तांदूळ अशा पोषण आहाराचा यात समावेश आहे. काही ठिकाणी तांदळाला जाळे लागले आहे, काही ठिकाणी वाटाणा छिद्र पडलेला आहे तर त्यावर घुबड देखील फिरताना दिसतात. हरबरा व गहू या धान्याला तर अक्षरशः भरड लागलेले दिसून आले. इतके निकृष्ट पोषण आहार दिले जात असेल तर चिमुकल्याचे पोषण तरी कसे होणार हाच प्रश्न निर्माण होत आहे. अंगणवाडीच्या सेविकांनी ही समस्या प्रशासनापुढे मांडली पण नेहमीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. निकृष्ट धान्याचे वितरण तरी कसे करावे असाच पेच अंगणवाडी सेविकांसमोर होता. काहींनी वाटप करणे टाळले तर काही अंगणवाडी मध्ये आदेश असल्याचे त्याचे वाटप करण्यात आले आहे. तब्बल जिल्ह्यात 20 हजार 303 बालकांची संख्या आहे. किराणा मालात हळद, सोयाबीन तेल, मुंग डाळ, साखर , मीठ, मिरची पावडर, चना, वाटाणा आदींचा समावेश आहे.