वर्ध्यात ‘आप’ मध्ये फुट; शहर संयोजकासह नऊ जणांचे राजिनामे
साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे /वर्धा:
आम आदमी पार्टीतील अंतर्गत गटबाजी, सतत होणारे आरोप, राजकीय डावपेच तसेच माझ्या विरोधात करण्यात येत असलेले गटबाजीचे आरोप या प्रकाराला कंटाळून पक्षाच्या शहर संयोजक पदाचा राजीनामा देत असल्याची माहिती आपचे शहर संयोजक श्रीकांत दोड यांनी आज सोमवार 19 रोजी स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यासोबतच कार्यकारिणीतील अन्य 9 जण हेसुद्धा राजीनामा देत असल्याचेही त्यांनी सांगितले.
श्रीकांत दोड पुढे म्हणाले, व्यवस्था परिवर्तनासाठी आम्ही आम आदमी पार्टीत प्रवेश केला. ते वर्धा जिल्हा आम आदमी पार्टीच्या वागण्यातून आणि कार्यातून दिसून येत नाही. फक्त राजकीय पोळी शेकण्याचे काम दिसून येत आहे. जिद्दीने काम करीत असल्यास आरोप करून आणि शिस्तीचे दाखले देऊन आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना शांत बसायला भाग पाडले जाते, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. आम आदमी पक्षाचे ध्येय धोरण अतिशय उत्तम व पारदर्शक असून मात्र वर्धा जिल्ह्यातील काही व्यक्ती विशेष पक्षाच्या लोकशाही पद्धतीला स्वत:च्या स्वार्थापोटी हुकुमशाही पद्धतीने राबवित असल्याचा आरोपही दोड यांनी केला.
दरम्यान, माझ्यासोबत आपचे शहर सचिव कुणाल लोणारे, संघटनमंत्री संजय आचार्य यांनी राजीनामा दिल्याचे जाहीर केले असून आमच्यासोबत शहर कार्यकारिणी सदस्य मनोहर वेरुळकर, महिला आघाडी शहर अध्यक्ष अंजू जिंद, सोशल मीडिया प्रमुख आकाश सुखदेवे, सहसंयोजक अतुल तिडके यांच्यासह 9 जणांनी राजीनामे दिल्याचे श्रीकांत दोड यांनी आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.
राज्यानाम्याची प्रत पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रंगाजी राचुरे, प्रदेश सचिव धनंजय शिंदे, विदर्भ अध्यक्ष देवेंद्र वानखेडे, विदर्भ सचिव अविनाश श्रीराव, जिल्हाध्यक्ष प्रमोद भोमले यांना पाठविण्यात आल्याची माहिती श्रीकांत दोड यांनी यावेळी दिली. पत्रकार परिषदेला
शहर सचिव कुणाल लोणारे, संघटनमंत्री संजय आचार्य उपस्थित होते.