वर्ध्यात एकाच दिवशी आगीच्या चार घटना ; अग्निशामक दलाची धावपळ

0

प्रमोद पाणबुडे / वर्धा :

शहर आणि परसरात मंगळवारी २९ मार्च रोजी आगीच्या घटनांनी एकच धावपळ झाली. आगीच्या चार घटना घडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने यात कुणी जखमी अथवा जीवीतहानी झालेली नाही. आगीवर लवकर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाने यश मिळविले.
शहरातील महादेवपुरा परिसरात महावितरणच्या रोहित्राला अचानक आग लागली. ही बाब स्थानिकांना दिसताच परिसरात एकच धावपळ झाली. याबाबत लागलीच अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निमशन दलाने माहिती मिळताच घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविले. त्या पाठोपाठ बजाज चौकालगत असलेल्या मोहता जिनींग परिसरातील मोकळ्या जागेत असलेल्या गवताने अचानक पेट घेतला. पाहता पाहता ही आग सर्वत्र पसरली. तेथील रहिवाशांनी पाणी टाकून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. पण, मोठ्या प्रमाणात गवत असल्याने आग परिसरात पसरली. अग्निशमन दलाने तेथे धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. येथे तीन बंब पाण्याचा वापर करत आगीवर नियंत्रण मिळविण्यता आले. स्थानिकांनीही आग पसरू नये, याकरिता धावपळ करत आग विझविण्याचा प्रयत्न केला. परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ निघत असल्याने आग बघण्यासाठी गर्दी झाली होती. जवळपास एक ते दोन तास प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
तर तिसरी घटना इंझापूर शिवारात असलेल्या नगरपालिकेच्या कचरा डेपोत घडली. कचरा डेपो परिसरातील कचर्‍याला अचानक आग लागली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ उठले होते. वर्धा – हिंगणघाट मार्गावर दुरून दिसणार्‍या धुराच्या लोळांमुळे आग मोठ्या प्रमाणात असल्याचे निदर्शनास येत होते. माहिती मिळाल्यानंतर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविले.
चौथी गोंड प्लॉट शिवारात घडली. दुपारच्या सुमारास दोन घरांच्या मध्यभागी असलेल्या रिकाम्या प्लॉटमधील गवताने अचानक पेट घेतला. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला बोलाविण्यात आले. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविले.

अग्निशमन दलाची धावपळ

आगीच्या चार घटनांमुळे अग्निशमन दलाची चांगलीच धावपळ झाली. सुरूवातीला महोदवपुर्‍यातील रोहित्र, नंतर बच्छराज जिनींग फॅक्टरी परिसर, इंझापूर शिवारातील कचरा डेपो आणि नंतर गोंड प्लॉट शिवारात आगीच्या घटनेने अग्निशमन दलाला धावपळ करावी लागली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!