वर्ध्यात विद्यार्थ्यांसोबत ‘लालपरी’ वाहकाचा उर्मटपणा; पोलिसांत तक्रार दाखल
साहसिक न्युज24
प्रतिनिधी/ देवळी:
शाळा सुटल्यानंतर गावाकडे परतणार्या भिडी येथील शालेय विद्यार्थ्यांना भिडी येथे न उतरवता रापंमच्या बसवाहकाने थेट कळंब जि. यवतमाळ येथे रात्रीच्या वेळी उतरवण्याची खळबळजनक घटना बुधवार 14 च्या रात्री घडली.
देवळी येथील जनता हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या 7 मुली आणि 12 मुले असे 19 विद्यार्थी सायंकाळी शाळा संपल्यावर भिडी येथे परतण्यासाठी पुसद आगारातील एम.एच. 40 वाय. 5893 या बसमध्ये चढले. भिडी स्थानक आल्यावर बसवाहक राहुल व्यवहारे याने भिडीला थांबा नसल्याचे अचानक सांगून बस थांबविण्यास नकार दिला. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांकडून भिडी ते कळंब तिकीटचे पैसेही वसूल केले. बस वाहकाच्या या उद्दामपणाची वार्ता विद्यार्थ्यांच्या पालकांमार्फत गावात पसरताच भिडी येथे काही काळ तणाव निर्माण झाला. पालकांनी 19 किमी अंतरावरील कळंब येथे धाव घेऊन एसटीला कळंब पोलिस स्टेशनमध्ये लावायला सांगितले. तिथे एसटी वाहक राहुल व्यवहारे आणि चालक विवेक वैद्य यांच्या विरोधात गैरवर्तनाची तक्रार विद्यार्थ्यांनी नोंदवली.
कळंब पोलिस स्टेशनमध्ये रात्री 9 पर्यंत कारवाई सुरू होती. त्यामुळे सकाळपासून उपाशी असणार्या विद्यार्थ्यांना घरी परतण्यास बराच उशीर झाला. कळंबचे ठाणेदार अजित राठोड यांनी विद्यार्थ्यांशी सौजन्य दाखवत वाहकाविरोधात त्वरित तक्रार नोंदवून घेतली.
भिडी येथे थांबा नव्हता तर वाहकाने विद्यार्थ्यांना बसमध्ये का घेतले. तसेच भिडी ते कळंब असे नमूद केलेली तिकीट विद्यार्थ्यांना कशी देण्यात आली, असा सवाल भिडीचे सरपंच सचिन बिरे, डॉ. प्रकाश काळे, सचिन गवळी, मनोज बोबडे, सतीश मेहत्रे आणि प्रशांत काळे यांनी उपस्थित केला.
सदर घटनेबाबत विभागीय वाहतूक अधिकारी विजय धायडे यांच्याशी संपर्क केल्यावर त्यांनी संबंधित आगाराच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या निदर्शनास ही घटना आणून देणार असल्याचे तरुण भारतच्या प्रतिनिधीला सांगितले.