विदर्भ ट्रॅव्हल्सच्या मालक ‘दरणे’याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ; मृतकाच्या कुटुंबीयाची मागणी
साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सला भीषण अपघात होऊन २५ जणांचा नाहक बळी गेला. यात वर्धा जिल्ह्यातील १४ जणांचा समावेश आहे. या बाबत आज दिनांक ९ रोजी वर्शांध्यातील भवन येथे मृतकांच्या परिवारानी बैठक घेत ट्रॅव्हल्स चालकाप्रमाणे मालकावरही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली.
१ जुलै रोजी विदर्भ ट्रॅव्हल्सचा बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर अपघात झाला. या ट्रॅव्हल्समध्ये सावंगी मेघे टि पॉईंट वरून पुणे येथे जाण्यासाठी जिल्ह्यातील १४ महिला व पुरुष प्रवाशी बसले होते. या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. चालक हा मद्यधूंद अवस्थेत असल्याने हा अपघात घडल्याचे समोर आले. त्यामुळे चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, या घटनेला मालकही तेवढेच जबाबदार असल्याचा सूर मृतात्म्यांच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या आज झालेल्या बैठकीत केला.
विदर्भ ट्रॅव्हल्सची मान्यता रद्द करावी, खाजगी वाहन चालकाची एक फेरी झाल्यानंतर त्याला दुसर्या फेरीसाठी परवानगी देऊ नये, वाहनाची गती बांधलेली असावी, खाजगी वाहनाचे नियम अधिक कडक करावे, समृद्घी महामार्गावर १०० ते १५० किमीचा प्रवास झाल्यानंतर एक थांबा अनिवार्य करावा, ट्रॅव्हल्सची तिकीट कॅन्सल पॉलिसी देण्यात यावी, ट्रॅव्हल्स मालकावर गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करावी, नागपूर ते पुणे रेल्वे गाड्यांची संख्या वाढवावी, अपघाताच्या संपूर्ण प्रकरणाची एक चौकशी समिती नेमून पीडितांना न्याय द्यावा, प्रत्येक कुटुंबातील एकाला शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे आदी मागण्यावजा चर्चा या बैठकीत करण्यात आली. यासंदर्भात लवकरच जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात येणार असल्याचेही बैठकीत एकमत झाले आहे.
तुमचे दु:ख चार दिवसांचे-
अपघात घडल्यानंतर मृतक प्रथमेश खोडे यांच्या आई निलीमा खोडे यांनी जाब विचारण्यासाठी ट्रॅव्हल्स मालक दरने यांना फोन केला असता तुमचे दु:ख फक्त चार दिवसाचे आहे. माझी संपूर्ण गाडी जळाली, या भाषेत उत्तर देऊन फोन कापला, अशी व्यथाही निलीमा खोडे हिने या बैठकीत मांडली.