समाजातील अंधश्रद्धा व अनिष्ट प्रथा दूर करण्यासाठी संत गाडगेबाबा यांनी आपले जीवन समर्पित केले, डॉ. मीना काळे.

0

🔥पशु रुग्णालय परिसर केले स्वच्छ- रासेयो व रोव्हर रेंजर्स स्काऊटिंगचा स्वच्छता अभियान दिनी उपक्रम

सिंदी (रेल्वे) : ‘समाजातील अंधश्रद्धा व अनिष्ट प्रथा दूर करण्यासाठी संत गाडगेबाबा यांनी आपले जीवन समर्पित केले. स्वच्छतेच्या माध्यमातून गावची घाण आणि अस्वच्छता साफ करणारे आणि आपल्या प्रभावी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनातील अंधश्रद्धेची घाण साफ करणारे संत होते.’ असे प्रतिपादन पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. मीना काळे यांनी 20 डिसेंबरला स्व सौ रमाबाई वझुरकर नगर कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथक व रोव्हर रेंजर स्काउटिंग पथक द्वारा आयोजित स्वच्छता अभियानात सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रेखा झिलपे तर प्रमुख अतिथी म्हणून रवींद्र ढोबळे, प्रा. उत्तम देवतळे, डॉ सतीश थेरे व रोव्हर लीडर तथा रासेयो वर्धा जिल्हा समन्वयक प्रा रवींद्र गुजरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
‘गाडगे महाराज शिकलेले नव्हते, परंतु वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे महान समाज सुधारक होते. ते आपल्या किर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत होते असे अध्यक्षीय मार्गदर्शनात मुख्याध्यापिका रेखा झिलपे यांनी व्यक्त केले. स्वच्छता अभियानाची सुरुवात ‘स्वच्छ भारत निरोगी भारत’ या घोषवाक्यांनी व प्रभात फेरीने करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पशुवैद्यकीय दवाखाना परिसर स्वच्छ केले. परिसरातील गांजर गवत, प्लॅस्टिक, बॉटल्स व इतर कचरा गोळा केला‌. यावेळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाळीव प्राण्यांची तसेच इतर जनावरांची निगा कशी राखावी व कुत्रा, साप किंवा अन्य प्राणी चावल्यास काय दक्षता घ्यावी यावर मार्गदर्शन केले.
समारोपीय कार्यक्रम विजय विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले. याप्रसंगी ‘स्वच्छता हीच खरी दौलत’ या विषयावर पथनाट्यातून स्वच्छतेचे महत्व व संत गाडगेबाबांचे संदेश अभिनयातून प्रस्तुत केले.
संत गाडगेबाबा यांनी समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि स्वच्छता तसेच चारित्र्य याची शिकवण दिली. झाडूने परिसर स्वच्छ करता करता समाजातील वाईट विघातक प्रथा परंपरा आपल्या कीर्तनातून त्यांनी सोप्याभाषेत प्रबोध करून समाजसुधारणेचे मोठे कार्य केले. असे प्रास्तविकेतून प्रा. रवींद्र गुजरकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन त्रुज्या वाटकर तर मनोगत रचना वैद्य, सुहानी चौधरी व रमिनी बोकडे यांनी प्रस्तुत केले. कार्यक्रमाचे आभार ऐश्वर्या भगत यांनी केले. अभियानाच्या यशस्वीतेकरिता प्रा. अभिजीत देशमुख, अध्यापक निलेश बहादे, समीक्षा नेवारे, शुभांगी पायघन, मेघा मुंगले, रितिका अटेल, रोहिणी मसराम, आकांशा भांडेकर, प्रगती धोटे, साक्षी शेळके, रोहिणी शेळके, समृद्धी दाते, रीना रोडे, तनु गायकवाड, मयूर पिने, परेश झाडे, कुणाल चौधरी, साहिल मसराम, केतन पिने व सुजल बलवीर यांनी अथक परिश्रम घेतले.

दिनेश घोडमारे साहसिक न्यूज-24 सिंदी रेल्वे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!