सामाजिक सलोख्यासाठी पत्रकारांनीही पुढाकार घ्यावा-वसंत मुंडे

0

Byसाहसिक न्युज 24
प्रतिनिधी / औरंगाबाद : धार्मिक विषय काढून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न काही प्रवृत्ती करत आहेत. अशा विषयांना प्रसारमाध्यमांनी महत्व देवू नये आणि सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा. समाजात पत्रकारांवर विश्‍वास असल्याने याचा सत्कार्यासाठी उपयोग करावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केले. विविधतेत एकता ही भारतीय संस्कृतीची ओळख कायम ठेवण्यासाठी समाजातील सर्वच घटकांची जबाबदारी असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
औरंगाबाद येथे शनिवार दि. 21 मे रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या विभागीय कार्यालयात प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या उपस्थितीत ईद मिलन कार्यक्रम झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. कैलास पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, भाजपचे अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष एजाज देशमुख, कम्युनिस्ट नेते अ‍ॅड. अभय टाकसाळ, नगरसेवक अफसर पठाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुर्व कार्याध्यक्ष तथा संपादक जावेद खान, अजमत खान, नंदकिशोर नजन, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अशोक थोरात, माजी सभापती मारोतराव साळवे, अनवर खान, प्राचार्य नामदेव सानप, कवी, साहित्यीक श्रावण गिरी, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, जिल्हाध्यक्ष डॉ. प्रभू गोरे आदींसह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग-व्यापार क्षेत्रातील नामवंत व्यक्तींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना वसंत मुंडे म्हणाले, सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने वर्षानुवर्ष राहत आहेत. एकमेकांच्या सुख दुःखात, उत्सवात सहभागी होण्याची परंपरा आहे. असे असताना काही प्रवृत्ती राजकारणासाठी धार्मिक विषय काढून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रवृत्तीकडून मांडल्या जाणार्‍या विषयांकडे प्रसारमाध्यमानीच दुर्लक्ष करणे गरजेचे झाले आहे. सामाजिक सलोखा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी समाजातील सर्वच घटकांची आहे. राजकारण लोकांच्या हिताचे आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाचे असावे. धार्मिक तेढ निर्माण करणारे असु नये. सामाजिक सलोखा बिघडू पहाणार्‍या प्रवृत्तींना आता प्रसारमाध्यमांनीच बाजुला करणे आवश्यक आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरा, भाईचारा टिकवण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा. यासाठीच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने राज्यभर ईद मिलनचे कार्यक्रम घेतले जात आहेत. कोरोना काळात सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकमेकांना मदत करण्याची भूमिका घेऊन मानवता धर्म निभावला. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या प्रवृत्तींना समाज थारा देणार नाही. त्यासाठी अराजकीय पत्रकार संघाच्या कार्यक्रमामधून राजकीय विरोधक असलेले सर्व पक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन संवाद साधल्यामुळे सामाजिक सलोखा अबाधित राहण्यास मदत होईल. यासाठी आता प्रत्येक गावातील पत्रकारांनी पुढाकार घेतला पाहिजे असे मत मुंडे यांनी व्यक्त केले.
विद्यमान सामाजिक परिस्थितीत समाज प्रबोधनाची गरज लक्षात घेऊन पत्रकार संघाने राज्यभर दिवाळी स्नेहमिलन व ईद मिलनचा उपक्रम राबवला. यातुन विविध विषयावर साधक बाधक चर्चा होऊन वातावरण सकारात्मक निर्माण होत आहे. एकीकडे राजकीय विरोधकांची वैयक्तिक मैत्री संपुष्टात येत असताना पत्रकार संघाच्या अशा कार्यक्रमातून हे विरोधक एकत्र येऊन काही काळ का होईना राजकीय विरोध विसरतात. राजकारणाला बाजूला ठेऊन समाजासाठी पत्रकारांना सोबत घेऊन काय करता येईल, यावर चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे पत्रकारांनीही आपल्या गावात सामाजिक सलोख्याचे उपक्रम राबविण्यावर भर द्यावा, असे आवाहनही शेवटी वसंत मुंडे यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुनिल वाघमारे, आरेफ देशमुख, विभाकर खांदेवाले, विलास शिंगी, छब्बुराव ताके, मनोज पाटणी, संजय व्यापारी, संदीप मानकर, सचिन उबाळे, काजी रफिक अहेमद, अनिस रामपूरे, तय्यब जफर, अखलाख देशमुख, अर्जुन पवार, सलमान नवाब पटेल, अभय विखणकर, शेख अमीर, आकाश ठाकूर, प्रकाश लकडे, अय्युब पठाण आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!